ठाकरे गटाचे नेते आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी अमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने मंगळवार, ९ जानेवारी रोजी छापा टाकला. जोगेश्वरी भूखंड प्रकरणी ही चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात.
रवींद्र वायकर यांच्याकडे यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात देखील छापे पडले होते. आता पुन्हा रवींद्र वायकर यांना नोटीस दिली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळी ८.३० वाजता ईडीचे अधिकारी निवासस्थानी दाखल झाले होते. या कारवाईनंतर रवींद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीने रवींद्र वायकर यांच्याविरोधात यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे.
ईडीने जोगेश्वरी येथील पंचतारांकित हॉटेलशी संबंधित कागदपत्रांची तपासणी पुन्हा सुरु केली आहे. ईडीकडून यासंदर्भात यापूर्वीही रवींद्र वायकर यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणात वायकर यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
हे ही वाचा:
यंदा कर्तव्यपथावर ‘शिवराज्याभिषेक’
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन आता सुसाट; प्रकल्पाचे १०० टक्के भूसंपादन पूर्ण
लक्षद्वीप मुद्द्यावरून इस्रायल भारताच्या पाठीशी; मोठ्या प्रकल्पाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर टांगती तलवार
रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी निवासस्थानी ईडीचे पथक पोहचले आहे. मातोश्री स्पोर्टस ट्रस्टचा आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावाने शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. या संदर्भात भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेले क्रीडांगण आणि गार्डनच्या जागेवर बांधकाम केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर व्यारवली गावात जमिनीवर बांधकाम केल्याचा आरोप रवींद्र वायकर यांच्यावर आहे. रवींद्र वायकर यांनी मुंबई मनपाच्या जागेवर बांधलेल्या हॉटेलची किंमत ५०० कोटी असल्याचा दावा करण्यात येत आहे.