शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर हे ईडीच्या निशाण्यावर आहेत. अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील राहत्या घरी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) सकाळी धाड टाकली. तसेच, ईडीकडून तब्बल १८ तास अर्जुन खोतकर यांची चौकशी करण्यात आली.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जालना येथील साखर कारखाना विक्रीत अर्जुन खोतकर यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केल्यानंतर ईडीने अर्जुन खोतकरांच्या घरावर छापा टाकला. काही दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी औरंगाबाद, जालना आणि नांदेडमधील काही ठिकाणी छापे मारले होते. किरीट सोमय्या यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप केला होता.
हे ही वाचा:
फडणवीसांची दिल्लीवारी ही संघटनात्मक बैठकीसाठीच
मुंबई महापालिकेत बसणार भाजपाचाच महापौर
चाळीसगावचे वर्दीतले चोर! बघा आमदारांनी केलेले Sting Operation
भाजप पदाधिकारी अमोल इघे यांची हत्या
अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील भाग्यनगर येथील बंगल्यावर शुक्रवारी सकाळीच साडे आठ वाजल्यापासून ईडीचं पथक दाखल झाले होते. १२ जणांच्या या पथकाने तपासणी केली. यावेळी अर्जून खोतकर घरीच होते, अशी माहिती आहे.
अर्जुन खोतकर हे सध्या जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. त्यामुळे जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचीही ईडीकडून तपासणी करण्यात आली. ईडीच्या कारवाईबद्दलची माहिती अर्जुन खोतकर आज प्रसारमाध्यमांना देणार आहेत.