राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांची ईडीच्या माध्यमातून चौकशी सुरू झाली आहे. जवळपास ७ तास ही चौकशी सुरू होती. त्यानंतरही जयंत पाटील यांना सोडण्यात आले नव्हते. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने ईडीविरोधात तसेच भाजपा सरकारविरोधात सगळीकडे आंदोलने हाती घेतली तसेच प्रमुख नेत्यांनी याविरोधात टीकाही केली.
आयएल अँड एफएस प्रकरणी जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. आयएल अँड एफएस कंपनीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप जयंत पाटील यांच्यावर आहे. आयएल अँड एफएस प्रकरणात याआधीही अनेकांची नावे समोर आली आहेत. आता जयंत पाटील यांचेही या प्रकरणी नाव समोर आलं आहे.
याबाबत सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन घेतले. रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत ईडीचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी यासंदर्भात टीका केली आहे. तर रोहित पवार यांनी कर्नाटक निकालांशीच याचा थेट संबंध जोडला आहे. विरोध पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या कारवाईतून दिसत असल्याचा नेहमीचा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.
हे ही वाचा:
मोदींच्या पाया पडले पवारांना मागे हटवले…
फुटबॉल स्टेडियममध्ये चेंगराचेंगरीमुळे गेला १२ जणांचा जीव
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये चकमकीत चार नक्षलवादी जखमी
दिल्लीमध्ये आणखी दोन दिवस उष्म्याचा कहर, तापमान अर्धशतकाकडे!
शरद पवार म्हणाले की, सत्तेच्या गैरवापराचे हे उदाहरण आहे. नवाब मलिक यांचेही उदाहरण शरद पवारांनी यानिमित्ताने पुढे केले. अशाप्रकारे जयंत पाटील यांना त्रास दिला जात आहे. सत्तेचा गैरवापर करून नेत्यांना त्रस्त करून सोडले जात आहे. एकीकडे सीबीआय, ईडी या तपास यंत्रणांवर टीका करताना आता एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर होत असलेल्या कारवाईबाबत मात्र सीबीआयची बाजू न घेता नवाब मलिकांचा संदर्भ त्यांनी दिला आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनावर भाजपाचे नेते राम शिंदे यांनी टीका केली आहे. अनेकांवर ईडीची कारवाई होते पण त्यासाठी शक्तीप्रदर्शनाची गरज नाही. विनाकारण लोकांसमोर तमाशा मांडण्याची गरज नाही. आपण धुतल्या तांदळासारखे आहोत, असे दाखविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. ईडीला जर काही संशयास्पद दिसते तेव्हा कारवाई केली जाते. चूक केली असेल तर शिक्षा भोगावी लागेल. काही केलेले नसेल तर भीतीची गरज काय, असेही शिंदे म्हणाले.