शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर आता मुंबईत दोन ठिकाणी छापेमारी केली असून संजय राऊत यांच्याशी संबंधित काही छोट्या नेत्यांची माहिती घेण्यासाठी तर ही छापेमारी सुरू नाही ना, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
ईडीने संजय राऊत यांच्याविरोधात जे कागदपत्र सादर केले आहेत त्यात १८वा मुद्दा हा महत्त्वाचा आहे. त्यात म्हटले आहे की, संजय राऊत यांना प्रवीण राऊतकडून अतिरिक्त रोख रक्कमही मिळालेली आहे. चौकशीअंती असे स्पष्ट होते की, ही रक्कम किहिम, अलिबाग येथे मालमत्ता खरेदीसाठी वापरली गेली. या चौकशीत जी माहिती समोर आली आहे, त्याच्या अगदी विपरित माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी रोख रक्कम दिल्याचा इन्कार संजय राऊत यांनी केला आहे. या चौकशीतून एक बाब समोर येते आहे की, संजय राऊत आणि त्यांच्याशी संबंधित काही छोट्या नेत्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ झालेली आहे.
हे ही वाचा:
‘मासिक पाळी’ प्रकरणातील मुलीनेच रचला होता बनाव!
अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीला ड्रोनने टिपले
संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप ईडीने ठेवला आहे. त्यासंदर्भात त्यांच्या घरी रविवारी सकाळी ईडीने धाड टाकली होती. तिथे तब्बल ९.३० तास चौकशी केल्यानंतर त्यांना संध्याकाळी फोर्ट येथील ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले. तिथेही त्यांची चौकशी सुरू राहिली. रात्री १२.०५ वाजता अटक करण्यात आली होती. आता त्यांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवसेनेकडून संजय राऊत यांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी आंदोलनेही सुरू आहेत.