सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने मंगळवार, १७ ऑगस्ट रोजी कारवाईचा धडाका लावला आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने महत्त्वाची कारवाई केली आहे. माजी आमदार विवेक पाटील यांच्याशी संबंधित जवळपास २३४ कोटींची मालमत्ता ईडी मार्फत जप्त करण्यात आली आहे. यामध्ये प्रसिद्ध अशा कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीचाही समावेश आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील हे सध्या अटकेत आहेत. कर्नाळा बँकेच्या बहुचर्चित ५२९ कोटींच्या घोटाळ्यामध्ये विवेक पाटील हे मुख्य आरोपी आहेत. या घोटाळ्या संबंधी पाटील यांना १५ जून २०२१ रोजी ईडीने अटक केली होती. तर आता याच घोटाळ्याशी संबंधित पाटील यांची मालमत्ता ईडी मार्फत ताब्यात घेण्यात आली आहे. यामध्ये कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीचा समावेश आहे. विवेक पाटील हे या अकादमीचे मालक आणि संस्थापक आहेत. तर या व्यतिरिक्तही पाटील यांच्याशी संबंधित इतर जमिनींवर ईडीने जप्ती आणली आहे.
हे ही वाचा:
पोलीस महासंचालकांचेच बनवले बनावट फेसबुक अकाऊंट
पुण्यात उभारले गेले पंतप्रधान मोदींचे मंदिर
आता या माध्यमातून अमेरिकेची तालिबानवर कारवाई?
अश्रफ घनी यांच्यानंतर ‘या’ महत्वाच्या व्यक्तीनेही देश सोडला
२०१९ पासून ईडी कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात तपास करत आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर ईडी कडून तपासाची सूत्रे हाती घेण्यात आली. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी विवेक पाटील यांनी अंदाजे ६३ बोगस बँक खात्यांमधून पैशाची हेराफेरी केल्याचा ठपका ठेवत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी या संस्थांच्या खात्यात बेकायदेशीरपणे कोट्यावधींची रक्कम वळवण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे.
काय आहे कर्नाळा बँक घोटाळा?
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा कर्नाळा नागरी सहकारी बँकेत ५२९ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे काही महिन्यांपूर्वी उघडकीस आले. सुमारे ५० हजार ६८९ खातेधारकांच्या ५२९ कोटींच्या ठेवी बँकेत होत्या. बँकेवर शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांचा पगडा होता. त्यामुळे शेकाप नेत्यांनी गैरमार्गाने ही रक्कम स्वतःच्या उद्योगधंद्यांसाठी वळती केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.