केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बिहारमधील जमुई आणि बांका जिल्ह्यात निवडणूक प्रचारसभांना संबोधित करताना विरोधी गटावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या ‘मासे खाण्याच्या व्हिडिओ’चा खरपूस समाचार घेतला आणि नवरात्रीच्या काळात भाविकांच्या भावना दुखावण्याच्या आणि ‘तुष्टीकरणाचे राजकारण’ करण्याच्या प्रयत्नांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
‘तुम्ही नवरात्रीमध्ये मासे खात आहात. तुम्हाला यातून कोणता संदेश द्यायचा आहे? मासे, डुक्कर, कबूतर, हत्ती किंवा घोडा, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही खा. परंतु त्याचे प्रदर्शन करण्याची काय गरज आहे? हे केवळ मतांसाठी केले जाणारे तुष्टीकरणाचे राजकारण आहे. यामुळे विशिष्ट धर्माचे लोक आपल्याला मतदान करतील असे त्यांना वाटते. लालूजी, मी तुम्हाला विनंती करतो की अशा लोकांना सांभाळा,’ असे राजनाथ सिंह जमुई येथील प्रचारसभेला संबोधित करताना म्हणाले.
या वक्तव्याचाच पुनरुच्चार त्यांनी बांका येथील निवडणूक प्रचारसभेत केला.लालू यादव यांची मुलगी मिसा भारती यांनी केलेल्या वक्तव्यावर राजनाथ सिंह यांनीही जोरदार टीका केली. त्यांचे सरकार स्थापन झाल्यास नरेंद्र मोदींना तुरुंगात पाठवले जाईल, अशा शब्दांत मिसा भारती यांनी बदला घेण्याची धमकी दिली होती. त्याचाही त्यांनी समाचार घेतला.
लालू यादव यांचा मित्र म्हणून उल्लेख करून संरक्षण मंत्री सिंह यांनी मीसा भारती यांच्या टीकेला उत्तर दिले.
हे ही वाचा:
इस्रायल-इराण संघर्षाबद्दल भारताने व्यक्त केली तीव्र चिंता!
एमएस धोनीने षटकार खेचावा, असे हार्दिक पांड्यालाच वाटत होते का?
सरबजीत सिंगच्या मारेकऱ्याची हत्या करणाऱ्याचे रणदीप हुडा याने मानले आभार
सरबजीत यांचा मारेकरी मारला गेला, मात्र न्याय मिळाला नसल्याची मुलीची खंत
‘त्यांचे कुटुंबीय म्हणत आहेत की, त्यांनी सरकार बनवल्यास ते मोदीजींना तुरुंगात टाकतील. परंतु विरोधकांची सरकार स्थापनेची स्वप्ने पूर्ण होणार नाहीत. जे तुरुंगात आहेत किंवा जामिनावर आहेत ते मोदीजींना तुरुंगात पाठवतील? बिहारचे लोक हे सर्व सहन करतील, पण हे नाही,’ असे राजनाथ सिंह म्हणाले. पंतप्रधान मोदींना तुरुंगात टाकण्याचे धाडस कोण करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
संरक्षणमंत्र्यांनी असेही नमूद केले की पंतप्रधान मोदींना पुढील वर्षी परदेशात नियोजित कार्यक्रमांसाठी आमंत्रणे मिळत आहेत. म्हणजेच संपूर्ण जगाचा विश्वास आहे की त्यांची सत्ता परत येणे अपरिहार्य आहे, हेच यातून दिसते आहे,’ असेही ते म्हणाले.
‘निवडणुकीचा हंगाम सर्वत्र अस्थिर म्हणून मानला जातो. लोक या वेळेला काही अंशी हतबलतेने पाहतात, परंतु भारताच्या बाबतीत तसे नाही. संपूर्ण जगाचा विश्वास आहे की पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा पदावर परततील. पुढील वर्षी होणाऱ्या कार्यक्रमांसाठी त्यांना आधीच परदेशात आमंत्रित करण्यात आले आहे,’ असेही सिंह यांनी सांगितले.