ई श्रीधरन कोणतेही पद भूषवू शकतात

ई श्रीधरन कोणतेही पद भूषवू शकतात

भाजपाचे केरळ प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी सांगितले की मेट्रोमॅन ई श्रीधरन मुख्यमंत्री पदापासून कोणतेही पद भूषवू शकतात.

राज्यव्यापी विजय यात्रेच्या पार्श्वभूमीवर केरळचे प्रदेशाध्यक्षांनी माध्यमांना सांगितले की,  येथील लोक युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (युडीएफ) आणि लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ) या दोन्ही पक्षांच्या विकासविरोधी कामांना कंटाळले आहेत.

“श्रीधरन यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्ती भाजपामध्ये येत आहेत, हे दाखवून देते की लोक युडीएफ आणि एलडीएफ यांच्या कार्यावर नाखूष आहेत. ते मुख्यमंत्री पदापासून कोणतेही पद भूषविण्यास योग्य आहेत. ते कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात.” जर भाजपा केरळमध्ये सत्तेत आले तर ई श्रीधरन यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी सांगितले.

याबरोबर त्यांनी असेही सांगितले की येत्या काही काळात अनेक नामांकित लोक राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (रालोआ) येऊ शकतात.

राज्यव्यापी विजय यात्रेचे उद्घाटन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. ही यात्रा सुरेंद्रन यांच्या नेतृत्वात केरळच्या कासारगोड या जिल्ह्यापासून सुरू झाली आहे. भाजपाचे विविध नेते येत्या काही काळात केरळच्या या यात्रेला भेट देणार आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री जनरल वि के सिंग, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री निर्मला सितारमन, प्रल्हाद जोशी, स्मृती इराणी इत्यादींचा समावेश होतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीने थिरुवनंतपुरम येथे ७ मार्च रोजी या यात्रेची सांगता होईल.

Exit mobile version