आज सर्वत्र दसरा सण मोठ्या आनंदात उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात दसरा आणि दसरा मेळावा हे दरवर्षीच समीकरण असते. भाजापा नेत्या पंकजा मुंडे यांचा बीडमध्ये दसरा मेळावा पार पडला. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पंकजा मुंडे पुढे चालवतात अशी टीका नेहमी पंकजा मुंडेंवर होत असते. या टीकेला प्रत्युत्तर या मेळाव्यातून पंकजा मुंडे यांनी दिले आहे. गोपीनाथ मुंडे यांनी ज्या पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्य विचारांचा वारसा हातात घेतला तो वारसा मी चालवत आहे, नरेंद्र मोदींच्या विचारांचा वारसा मी चालवत आहे. जे.पी नड्डा, अमित शहा यांचा वारसा मी चालवत आहे असे सडेतोड उत्तर पंकजा मुंडे यांनी दिले आहे.
बीडमधील सावरगाव येथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मी खुर्चीसाठी राजकारण करत नाही. माझ्याकडे कोणतंही पद नाही पण तरीही मी कोणावरही नाराज नाही. मी का नाराज होऊ? राजकारणात मोठ्या मोठ्या लोकांना संघर्ष करावा लागला आहे. मी २०२४ च्या तयारीला लागली असल्याचे त्या म्हणाल्या. हा दसरा मेळावा चिखल फेकणाऱ्यांचा नाही तर चिखल तुडवणाऱ्यांचा आहे. स्वर्गीय मुंडे साहेबांच्या विरोधकांनी पातळी सोडून माझ्यावर टीका केली. परंतु मी कधीही खालच्या पातळीवर टीका केली नाही. ते माझ्या रक्तात नाही, असेही प्रत्युत्तर त्यांनी टीकाकऱ्यांना दिले आहे.
मेळाव्याच्या व्यवस्थेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, माझ्याकडे तुमच्यासाठी खुर्च्या नाहीत. मला तुमची काहीच व्यवस्था करता आलेली नाही आणि माझी ऐपतही नाही. या परिस्थितीही तुम्ही मला सांभाळून घेताय, ही मोठी गोष्ट आहे. संघर्षाशिवाय नाव होत नाही. भगवानबाबांनाही खूप मोठा संघर्ष करावा लागला. त्यांना खूप परीक्षा द्याव्या लागल्या. भगवानगड स्थापन कारावा लागला. श्रीकृष्णालाही संघर्ष करुन द्वारका स्थापन करावी लागली. शिवाजी महाराजांनीही संघर्ष केला. गोपीनाथ मुंडे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष केला. त्यामुळे मी संघर्ष नाकारू शकत नाही. मला खूप संघर्ष करावा लागला, गोपीनाथ गडाची स्थापना करावी लागली पण तरीही मी संघर्ष सोडला नाही. शिवाजी महाराज, संभाजी महाराजांची प्रेरणा मी घेतली आहे. थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कुणासमोर कधीही झुकणार नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
कार्यकर्त्यांना प्रेरणा देत त्या म्हणाल्या, शिवाजी महाराजांच्या काळात जळणाऱ्या होळीतून नारळ काढणाऱ्याला सोन्याचं कडं दिलं जात होतं. तसं तुम्ही माझ्या हातातील कडं आहात. त्यामुळे कोणत्याही आगीमधून नारळ बाहेर काढण्यासाठी मी मागेपुढे पाहणार नाही. मी फक्त गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत नाही. तर मी पंडित दिनदयाळ उपाध्याय, अटलजींचा, नरेंद्र मोदी, अमित शाहांचा वारसा चालवते. मी शत्रुविषयी वाईट बोलत नाही तर माझ्याविषयी वाईट बोलणारांवर टीका कशी करेल.
हे ही वाचा
नवरात्र २०२२: सतीचे दात इथे पडले म्हणून दंतेश्वरी शक्तीपीठ
सी- लिंकवर झालेल्या विचित्र अपघातात पाच जणांचा मृत्यू
दुसऱ्या महायुद्धाच्या ८३ वर्षांनंतर पोलंडची जर्मनीकडे १.३ ट्रिलियन डॉलर्सच्या नुकसान भरपाईची मागणी
२४ वर्षांनंतर अनुकंपा तत्वावर नोकरी मागणाऱ्या तरुणीला फटकारले
गर्दी माझी शक्ती आहे, हे मला जे.पी. नड्डा यांनी सांगितलं. माहूरच्या रेणुकामातेच्या दर्शनासाठी गेल्यावर लोकांची प्रचंड गर्दी जमली होती. त्यानंतर माझ्यावर गर्दी करण्याचा आरोप केला गेला. मात्र आमचे पक्षप्रमुख जे.पी. नड्डा यांनी सांगितलं की ही गर्दी तुमची ताकद आहे. त्यामुळे तुमच्या गर्दीची तुम्ही काळजी घ्या असाही सल्ला जे.पी नड्डा यांनी दिला असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. तसेच मी नाराज असल्याच्या बातम्या ज्या मीडियामधेय दाखवल्या जातात त्या बातम्या मीडियाने बंद कराव्यात अशी विनंतीही यावेळी पंकजा मुंडे यांनी केली आहे.