नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी २४ तासात २४ मृत्यू झाले होते. त्यानंतर देशभरात संतापाची लाट निर्माण झाली होती. नांदेडच्या घटनेप्रकरणी आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आरोपांवर प्रत्युतर दिलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, गोव्यामध्ये टेबलवर नाचायला पैसे आहेत, गुवाहटीमध्ये मजामस्ती करायला पैसे आहेत, पण औषधासाठी पैसे नाहीत का ? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. एक फूल दोन हाफ कुठे आहेत. सरकारकडे औषधांसाठी पैसे नाही म्हणता, पण परदेश दौरा सुरु आहे, जाहीरातबाजी करण्यासाठी सरकारकडे पैसे कुठून येतोय, अशी टीका त्यांनी केली.
यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आरोपांवर प्रत्युतर दिले. ते म्हणाले, कोरोना काळात मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार त्यांच्या सरकारमध्ये झालाय. नांदेडमधील प्रकार दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. पण, यात राजकारण केलं जात आहे ते आणखी दुर्दैवी आहे. ज्यांना मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याची सवय लागली आहे. त्यांच्याकडून आपण अधिक काही अपेक्षा करु शकत नाहीत, असं प्रत्युत्तर देत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नक्षलवाद्यांच्या संदर्भात करावयाच्या उपाययोजना याबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत बैठक बोलवली होती. शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या आरोपांवर प्रत्युतर दिलं आहे.
हे ही वाचा:
‘न्यूजक्लिक’ने अमेरिकी उद्योगपतीकडून स्वीकारले २८.२९ कोटी रुपये!
‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’च्या आयुष्याची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर
गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी
संजय सिंह यांची अटक वॉरंटशिवाय अथवा कारणाशिवाय नाही
ते पुढे म्हणाले, कोरोना काळात डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले, तीनशे ग्रॅम खिचडी १०० ग्रॅमला देवून पैसे खाल्ले, ऑक्सिजनमध्ये पैसे खाल्ले. हे बाहेर येत असल्याने लक्ष हटवण्यासाठी सीबीआयची मागणी केली आहे. ही मागणी चांगली आहे. यामध्ये कोरोना काळातील नक्की चौकशी होईल. औषधांची खरेदी चुकीच्या प्रकारे केली असेल तर त्याचीही चौकशी केली जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
नांदेडच्या प्रकरणाची देखील चौकशी सरकार करत आहे. कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, असं शिंदे म्हणाले. कोरोना काळात तोंडावर मास्क लावून फेसबुक लाईव्ह घरात बसून करत होते, आम्ही रस्त्यावर उतरुन काम करतो. पीपीई कीट वापरुन हॉस्पिटलमध्ये गेलो. तेव्हा हे लोक घरात बसले होते. अशा प्रकारचे मुख्यमंत्री जगाने पाहिले नाहीत, असं मुख्यमंत्री म्हणाले. ठाकरे घरात बसून पैसे मोजत बसले होते. कोरोना काळात त्यांचा खरा चेहरा समोर आला. मुंबई महापालिकेचे भ्रष्टाचाराचे पैसे कुठे गेले हे बाहेर येईल. नगरसेवक देखील घरात बसून काम करु शकत नाही. त्यामुळे घरात बसून काम करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये. एक फूल आणि एक हाफ यांनी आम्हाला सांगू नये, अशी टीका शिंदे यांनी केली.