छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला अशी ओरड करत १३ डिसेंबरला पुणे बंद केल्यामुळे व्यावसायिकांचे तब्बल ३३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
विविध संघटनांच्या माध्यमातून हा बंद झाल्याचे म्हटले जात असले तरी या बंदला महाविकास आघाडीतील पक्षांचीच फूस होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला यावरून गेले अनेक दिवस हे पक्ष ओरड करत आहेत. मुंबईतही १७ डिसेंबरला याचसंदर्भात मोर्चा निघणार आहे. त्याच्याआधी पुणे बंद करण्याची घोषणा करण्यात आली. यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान मात्र झाले. हेच पक्ष महाराष्ट्रातून रोजगार गेला म्हणून गेले काही महिने बोंब ठोकत आहेत, त्यांनी एक दिवसाच्या बंदमुळे त्या दिवसासाठी तोंडचा घास हिरावला.
हे ही वाचा:
१ लाख बँकेतून गायब झाले आणि पोलिसांनी लगेच ते मिळविलेही!
पश्चिम रेल्वेच्या सेवेत ‘यात्री ॲप’
महिला क्रिकेट सामन्यांत प्रेक्षकांनीच केला विक्रम
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ महत्त्वाचे निर्णय झाले
मंगळवारचा दिवस हा व्यापाराचा दिवस असल्यामुळे या व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. पुणे शहर हे कापड व्यवसायासाठी ओळखले जाते. त्याची उलाढाल ही ८ ते १० कोटींची असते. कापड व्यावसायिकांचे ५ कोटींचे तर सराफी व्यावसायिकांचे २५ कोटींचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात व्यावसायिकांमध्ये प्रचंड चर्चा सुरू आहे.
सकाळपासून हा बंद पाळण्यासाठी व्यावसायिकांना सक्ती करण्यात येत होती. काहींनी तोडफोड किंवा अशी एखादी घटना घडून नुकसान होऊ नये म्हणून स्वतःहून दुकाने बंद ठेवली. तर काही ठिकाणी दुकाने बंद करण्यास भाग पाडले गेले.
पुण्यातील एका महिलेचा व्हीडिओ यानिमित्ताने व्हायरल होत आहे. त्यात या महिलेने दुकान बंद करण्यास नकार दिला तेव्हा त्या महिलेला दादागिरी दाखविण्यात आली. तेव्हा तुम्ही शिवाजी महाराजांचे नाव घेता आणि अशी दादागिरी करता, हे शोभते का. महाराजांचा एखादा तरी गुण घ्या, असे प्रत्युत्तर त्या महिलेने दिले. त्या महिलेचे प्रचंड कौतुक होत आहे.