ठाकरे सरकारने शिक्षणाच्या क्षेत्रात कायमच घोळ घातला आहे. आता तर सरकारच्या उदासिनतेमुळे स्वाधार योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. ही स्वाधार योजना म्हणजे अनेकांसाठी वरदान आहे. ज्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना पात्र असूनही समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांना भाड्याने खोली घेता यावी म्हणून ही योजना आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना असे या योजनेचे नाव आहे.
खासकरून शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नसेल तर त्यांच्यासाठी स्वाधार योजना उपयोगी पडते. परंतु शासनाच्या निष्क्रियतेमुळे स्वाधार योजना मात्र आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. ज्या विद्यार्थी वर्गाची परिस्थिती हलाखीची असते, अशांनाच या योजनेचा लाभ मिळतो. परंतु सरकारदरबारी मात्र कशाचेच सोयरसुतक असलेले दिसून येत नाही. सद्यस्थितीमध्ये लाभापासून वंचित राहिल्यामुळे, अनेकांना कर्ज काढून शिक्षणाचा खर्च भागवावा लागत आहे.
हे ही वाचा:
अमित शाह- फडणवीस यांच्यात गुप्त बैठक
बला टळणार नाही…मी कुठेही जात नाहीये
महाराष्ट्राच्या राजकारणात नवा जेम्स बॉण्ड?
स्वाधार योजनेचा फायदा हा अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध विद्यार्थी वर्गाला फायद्याची आहे. मुख्य म्हणजे ११ वीनंतर शिक्षणासाठी बाहेर गेलेल्या अनेक मुलांना यामुळे वसतिगृहात भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता आदींसाठी आर्थिक मदत केली जाते. या स्वाधार योजनेकरता निवड झालेला विद्यार्थी हा स्वाधार लाभार्थी असून त्याला शैक्षणिक बाबींमधली मदत ही केली जाते. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, २०१८ ते २०१९ या वर्षात २१ हजार ६५१ लाभार्थी होते. त्यानंतर ही संख्या मात्र कमी होत गेली.
अनेकांना या योजनेचा पहिल्या टप्प्याचा लाभ घेता आला परंतु दुसरा टप्पा अद्यापही थकीत आहे. चालू वर्षातील म्हणजे २०२०-२०२१ मध्ये तर अजूनही कोणताच हप्ता देण्यात आलेला नाही. त्यामुळेच आता राज्यातील अनेक विद्यार्थी या योजनेपासून वंचित झालेले आहेत. सामाजिक न्याय विभागाकडे वारंवार निवेदन देऊनही स्वाधार योजना ही दुर्लक्षितच राहिलेली आहे. त्यामुळे अनेक गरजू विदयार्थी पदरचे पैसे घालत आहेत.