असह्य वसुलीबाजीमुळे महाराष्ट्रातील आयपीएस अधिकारी प्रतिनियुक्तीवर

असह्य वसुलीबाजीमुळे महाराष्ट्रातील आयपीएस अधिकारी प्रतिनियुक्तीवर

बजाज यांच्या प्रतिनियुक्तीबद्दल भातखळकरांची ठाकरे सरकारवर टीका

ठाकरे सरकारची वसुलीबाजी आणि झोल असह्य झाल्यामुळे राज्यातील प्रामाणिक आणि कर्तबगार आयपीएस अधिकाऱ्यांनी प्रतिनियुक्तीवर जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे. सुबोध जयस्वाल, रश्मी शुक्ला आणि आता नवल बजाज. अशी बोचरी टीका भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

सध्या अतिरिक्त पोलिस महासंचालक (आर्थिक गुन्हे) असलेले नवल बजाज यांची नुकतीच केंद्रात प्रतिनियुक्तीवर बदली झाली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (सीआयएसएफ) त्यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. प्रतिनियुक्तीच्या आदेशानंतर बजाज यांनी पोलिस महासंचालक संजय पांडे यांची मंगळवारी भेट घेतली.

याआधीही, महाराष्ट्रातील अनेक आयपीएस अधिकारी केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेलेले आहेत. राज्याचे माजी पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल हे सीआयएसएफचे महासंचालक म्हणून केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले होते. तसेच महासंचालक (नागरी सुरक्षा) रश्मी शुक्लादेखील सीआयएसएफमध्ये प्रतिनियुक्तीवर गेल्या आहेत. त्यापूर्वी, मुंबईचे सहपोलिस आयुक्त संतोष रस्तोगी हे प्रतिनियुक्तीवर सीबीआयमध्ये गेले आहेत. आता नवल बजाज यांनीही केंद्रात जाण्याची तयारी केली आहे. पोलिस उपमहानिरीक्षक मनोजकुमार शर्मा हे आधीच प्रतिनियुक्तीवर गेलेले आहेत.

तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर जयस्वाल केंद्रात गेले. रश्मी शुक्ला यांचे नाव सध्या सुरू असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात चर्चेत आहेत. महाविकास आघाडीने त्यांची राज्य गुप्तवार्ता आयुक्त पदावरून बदली करताना त्यांना पदोन्नती दिली पण महासंचालक (नागरी सुरक्षा) हे दुय्यम पद दिले.

गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत मुंबई, महाराष्ट्रातील आयपीएस पोलिस अधिकारी विविध कारणांनी चर्चेत आहेत. त्यामुळे एकूणच पोलिस दल ढवळून निघाले आहे.

Exit mobile version