बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील गाड्यांवर केला हल्ला

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळला

बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील गाड्यांवर केला हल्ला

महाराष्ट्र-कर्नाटक वादाने मंगळवारी उग्र रूप धारण केले. कन्नड रक्षण वेदिका या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या गाड्या अडवून त्यांची तोडफोड करून रस्ते अडवत गोंधळ घातला.

पुण्याहून बेंगळुरूकडे जाणाऱ्या वाहनांवर हा हल्ला करण्यात आला असून ट्रकच्या काचा फोडण्यात आल्या आहेत तसेच त्यांच्या नंबर प्लेट लाथा मारून, हाताने उचकटून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे तिथे प्रचंड गोंधळ निर्माण झाला असून या आंदोलकांना पोलिस उचलून नेत आहेत. पण काही आंदोलक हे गाड्यांखाली झोपले आहेत, काहींनी गाड्यांच्या टपावर चढत संघटनेचे झेंडे दाखवत घोषणाबाजी सुरू केली आहे.

या आंदोलकांना पोलिसांनी पकडून पोलिस व्हॅनमध्ये कोंबले आहे. या संघटनेचे प्रमुख नारायण गौडा हेदेखील तिथे होते. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा:

‘बाबासाहेबांच्या संविधानामुळेचं मी मुख्यमंत्री झालो’

पाकिस्तानशी चर्चा नाहीच, भारताची भूमिका

एक्झिट पोलनुसार गुजरात, हिमाचलमध्ये भाजपाचा बोलबाला

‘अनेक देशांसाठी भारत हा रोल मॉडेल’

महाराष्ट्रातील गाड्या पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका या संघटनेने घेतली आहे. त्यावरून महाराष्ट्रातही राजकारण पेटले आहे. शिंदे फडणवीस सरकारने यावर नाराजी व्यक्त केली असून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी संवाद साधला जाईल, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने तिथे जाणार होते. पण तिथे वाद उत्पन्न होऊ नये म्हणून हा दौरा टाळण्यात आला. पण तरीही महाराष्ट्रातून तिथे जाणाऱ्या गाड्यांना अडवून त्यावर हल्ले करण्यात आले. याबाबत मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे त्यामुळे तिथे अशांतता माजू नये म्हणून आम्ही बेळगावला जाणे टाळले. पण लवकरच आम्ही तिथे जाऊ. आम्हाला तिथे कुणी प्रवेश करू देणार नाही, असे होऊ शकत नाही.

Exit mobile version