झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू भाजपाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार

झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू भाजपाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार

झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपदीपदाच्या उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीने घोषणा केली आहे. ओदिशामधील आदिवासी समाजातील असलेल्या मुर्मू यांची आता राष्ट्रपतीपदासाठी यशवंत सिन्हा यांच्याशी लढत होईल. विरोधी पक्षाच्या वतीने यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा झाली होती. ६४ वर्षीय मुर्मू यांची जर निवड झाली तर त्या आदिवासी समाजातील पहिल्या महिला राष्ट्रपती ठरतील.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलैला होणार आहे आणि त्याची मतमोजणी २१ जुलैला होणार आहे. नवे राष्ट्रपती २५ जुलैला शपथ ग्रहण करतील. राष्ट्रीय निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे.

भाजपाच्या संसदीय मंडळाने राष्ट्रपदीपदासाठी विविध नावांची चर्चा केली आणि शेवटी मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. एकूण २० नावांची चर्चा यासाठी करण्यात आली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितले की, पूर्व भारतातून एखादी महिला आणि आदिवासी समाजातील व्यक्तिची निवड करायची आहे, असे ठरले होते.

हे ही वाचा:

‘धर्मवीर ‘चे संकेत मुख्यमंत्र्यांना कळलेच नाहीत…

विरोधी पक्षातर्फे राष्ट्रपतीपदासाठी यशवंत सिन्हा

महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होणार!

“मविआ सरकार अल्पमतात; उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”

२०१७च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही मुर्मू यांच्या नावाचा विचार झाला होता. पण बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. दलित समाजातील असलेल्या कोविंद यांना प्राधान्य देण्यात आले. ६४ वर्षीय मुर्मू यांनी विधान परिषदेतील आमदार म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केला. ओदिशातून त्या दोनवेळा भाजपाच्या आमदार राहिलेल्या आहेत. नवीन पटनायक सरकारमध्ये त्या मंत्रीही राहिलेल्या आहेत. भाजपाच्या मदतीने तिथे बिजू जनता दलाची सत्ता असताना मुर्मू या त्या मंत्रिमंडळात होत्या. ओदिशातील मयुरभंज जिल्ह्याच्या त्या भाजपा प्रमुखही राहिलेल्या आहेत. ओदिशा मतदारसंघात त्यांनी रायरंगपूरचे प्रतिनिधित्व केले होते.

सकाळी विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांचे नाव जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, गोपाळकृष्ण गांधी यांनी या पदासाठी उभे राहण्यास नकार दिल्यानंतर सिन्हा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

दोन्ही सभागृहांचे प्रतिनिधी, सर्व राज्यातील विधिमंडळाचे प्रतिनिधी तसेच दिल्ली आणि पुद्दुचेरीचे प्रतिनिधी या निवडणुकीसाठी मतदान करतील.

 

Exit mobile version