एनडीएच्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून एनडीएच्या मतांपेक्षाही अधिक मते मिळतील. तसेच मुर्मू यांना विक्रमी मताधिक्य मिळेल, असा विश्वास गुरुवार,१४ जुलै मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या खासदार व आमदारांशी संवाद साधण्यासाठी मुर्मू मुंबईत आल्या होत्या. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात एनडीएच्या नेत्यांनी विश्वास व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले व डॉ. भारती पवार, भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे व सी. टी. रवी, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आ. आशिष शेलार व आ. भारत गोगावले उपस्थित होते. शिवसेनेसह एनडीएचे घटकपक्ष, सहयोगी पक्ष व अपक्ष आमदार बैठकीस उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या पवित्र भूमीला माझा नमस्कार, अशी मराठीतून सुरुवात करून द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, देशाला गौरन्वित करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबडकरांसारख्या महान व्यक्ती या राज्यातून झाले आहेत. उद्योग, व्यापार, शिक्षण, कृषी अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राने प्रगती केली आहे. राज्यातील आमदार खासदारांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी यावेळी आभार व्यक्त केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य घरातील एका कर्तबगार महिलेला सर्वोच्च पदावर बसण्याची संधी दिली आहे. त्याबद्दल मोदीजींचे अभिनंदन शिंदे यांनी केले. तसेच मुर्मू यांना राज्यात विक्रमी मते मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात प्रथमच आदिवासी राष्ट्रपती मिळणे हे सौभाग्य आहे. ही नव्या युगाची सुरुवात आहे.
हे ही वाचा:
राज्यातील नगरपरिषद निवडणूका लांबणीवर
शिंदे- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल पाच रुपयांनी, डिझेल तीन रुपयांनी स्वस्त
पाकिस्तानात हिंदू मुलीचे बळजबरीने धर्मांतर करून मुस्लिम मुलाशी लग्न
द्राैपदी मुर्मू यांचे मुंबईत जंगी स्वागत
यावेळी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, भाजपाच्या संसदीय मंडळाने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राष्ट्रपतीपदाचा मान शोषित पीडीत समाजातील महिलेला देण्याचे ठरविले. त्यानंतर द्रौपदी मुर्मू यांची एकमताने निवड केली. त्यांच्या रुपाने प्रथमच एक आदिवासी महिला राष्ट्रपती होणार आहे. त्यांना महाराष्ट्रातून अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळतील.