विरोधक देशविरोधी कारवाया करत आहेत… दक्षिण कोरियात गोंधळ

द. कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांनी मंगळवारी रात्री अचानक देशात आणीबाणी मार्शल लॉ लागू करण्याची केली घोषणा

विरोधक देशविरोधी कारवाया करत आहेत… दक्षिण कोरियात गोंधळ

गेल्या काही तासांत दक्षिण कोरियाच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांनी मंगळवारी विरोधी पक्षांना दोष देत देशात ‘आणीबाणी मार्शल लॉ’ लागू करण्याची घोषणा केली. मात्र, सहा तासांनंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला. मार्शल लॉ लागू करण्यामागील युक्तिवाद त्यांनी सांगितला की, संसदेवर नियंत्रण ठेवणारे विरोधी पक्ष, उत्तर कोरियाबद्दल सहानुभूती बाळगणे आणि देशविरोधी कारवायांमधून सरकार पाडण्याचा प्रयत्न करणे. दक्षिण कोरियाच्या लोकशाही इतिहासात राष्ट्राध्यक्षांनी मार्शल लॉ लागू करण्याचा आदेश देण्याची ही पहिलीच वेळ होती.

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांनी मंगळवारी रात्री ११ वाजता देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशात आणीबाणी मार्शल लॉ लागू करण्याची घोषणा केली. यासाठी त्यांनी विरोधकांवर आरोप करत सरकारला अधू करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले.

राष्ट्रपती योले म्हणाले की, विरोधक देशविरोधी कारवायांमध्ये गुंतले आहेत आणि ते उत्तर कोरियाच्या अजेंड्यावर काम करत आहेत. उत्तर कोरियाच्या कम्युनिस्ट शक्तींच्या धमक्यांपासून दक्षिण कोरियाचे रक्षण करण्यासाठी आणि देशविरोधी घटकांना संपवण्यासाठी आणीबाणी मार्शल लॉ जाहीर करत आहे. देशाच्या स्वतंत्र आणि घटनात्मक व्यवस्थेचे रक्षण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. मार्शल लॉची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रपतींनी लष्कर जनरल पार्क उन सु यांची मार्शल लॉ कमांडर म्हणून नियुक्ती केली. ज्यांनी सर्व राजकीय क्रियाकलाप, रॅली आणि निदर्शनांवर बंदी घातली.

राष्ट्रपतींच्या या घोषणेने विरोधकांसह देशभरात संतापाची लाट उसळली होती. केवळ विरोधकच नाही तर राष्ट्रपतींच्या पीपल पॉवर पार्टीच्या खासदारांनीही या निर्णयाला विरोध केला. पक्षाचे प्रमुख नेते हान डोंग हून यांनी तीव्र आक्षेप व्यक्त केला. विरोधी पक्षनेत्यांनी लोकांना संसदेबाहेर जमण्यास सांगितले. काही वेळातच हजारो लोक संसदेबाहेर जमले. यावेळी मार्शल लॉ संपवा आणि हुकूमशाही उलथून टाका अशा घोषणा लोक देऊ लागले. ही चिघळलेली परिस्थिती पाहून पोलिसांनी संसद परिसराला घेराव घातला. मात्र अनेक विरोधी नेते बॅरिकेड्स ओलांडून खिडक्यांमधून संसदेच्या संकुलात दाखल झाले. विरोधी पक्षाच्या खासदारांनीही संसदेला घेराव घालून घोषणाबाजी केली.

आंदोलकांनी लष्कराची वाहने रस्त्यावर अडवून लष्कराने लावलेले बॅरिकेड्स हटवण्यास सुरुवात केली. अनेक विरोधी नेत्यांना अटक करण्यात आली. विरोधकांनी तातडीची बैठक बोलावली राष्ट्राध्यक्ष योले यांच्या या घोषणेनंतर लगेचच देशातील विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने आपल्या खासदारांची जमवाजमव सुरू केली. याच काळात पक्षाची तातडीची बैठकही झाली. या बैठकीत राष्ट्रपतींनी उचललेली पावले आणि सरकारने घातलेले निर्बंध यावर चर्चा झाली. विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने म्हटले की, मार्शल लॉची घोषणा घटनाबाह्य आहे. नॅशनल असेंब्लीने मार्शल लॉच्या विरोधात मतदान केल्यानंतर, अध्यक्ष योले यांनी हा निर्णय तात्काळ प्रभावाने मागे घेतला. राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींना संसदेच्या निर्णयांचे पालन करावे लागते.

हे ही वाचा:

अल्लू अर्जुनच्या पुष्पा-२ला ऍडव्हान्स बुकिंगमधून मिळाले १०० कोटी

मंदिरांमधून मूर्तींची चोरी करणाऱ्या यासीन आणि आमीनच्या मुसक्या आवळल्या

भारत- चीन करारानंतर सीमेवर ‘सब शांती शांती है!’

चिन्मय कृष्णा दास यांच्या बाजूने लढणाऱ्या बांगलादेशी वकिलावर बांगलादेशात हल्ला

लष्कराला रस्त्यावरून माघार घेण्याचे आदेश देत असल्याचे त्यांनी सांगितले. हे पाऊल राष्ट्राध्यक्ष यून यांच्या राजकीय भवितव्यासाठी धोक्याचे ठरू शकते कारण त्यांची देशात लोकप्रियता खूपच कमी आहे आणि या निर्णयानंतर त्यांना देशभरातील लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

Exit mobile version