बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर बिहारच्या राजकारणात गोंधळ उडाला होता. त्यानंतर नितीश कुमार यांनी भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तरी त्यांना सोमवार, १२ फेब्रुवारी रोजी विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. या बहुमत चाचणीपूर्वी बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
दरम्यान, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा पोलीस पोहचले होते. तेजस्वी यादव यांनी आमदारांना बंदिस्त करून ठेवल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी तेजस्वी यादव यांचं घर गाठलं होतं.
आरजेडी आमदार चेतन आनंद यांचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार पाटणा पोलिसांत करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून चेतन आनंद घरच्यांच्या संपर्कात नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी ही तक्रार केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी तेजस्वी यादव यांच्या घरी धाड मारून याबाबत चौकशी केली. परंतु, या चौकशीत चेतन आनंद यांनी मी स्वखुशीने येथे आलो आहे असा जबाब दिला.
रविवारी रात्री बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानाला पोलिसांनी वेढा घातला. याठिकाणी राजदचे आमदार चेतन आनंद यांना शोधण्यासाठी पोलीस आले होते. चेतन आनंद यांच्या भावाने पोलिसांकडे तक्रार केली होती. तेजस्वी यादव यांनी माझ्या भावाला त्यांच्या घरात डांबून ठेवले आहे, असे या तक्रारीत म्हटले होते. त्यामुळे पोलिसांनी तेजस्वी यादव यांच्या घरी जाऊन चेतन आनंद यांची भेट घेतली. सध्या राजदचे सर्व आमदार तेजस्वी यादव यांच्या घरी आहेत. पोलिसांनी या परिसरात जमावबंदीचे कलम लागू केले आहे.
दरम्यान, नितीश कुमार हे भाजपसोबत गेले असले तरी जेडीयु आणि भाजपचे काही आमदार बहुमत चाचणीवेळी तेजस्वी यादव यांना साथ देतील, अशी चर्चा आहे. हिंदुस्थानी आवामी मोर्चाचे प्रमुख जीतन राम मांझी यांचा फोन सध्या स्वीच ऑफ असल्याची माहिती आहे. दरम्यान भाजपाचे नेते नित्यानंद राय मांझी यांच्या घरी गेले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. परंतु, बहुमत चाचणीत मांझी यांचे आमदार नितीश कुमार यांना साथ देतील, याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. रविवारी जेडीयु विधिमंडळ गटाची बैठक झाली होती. त्यावेळी जेडीयुचे बीमा भारती, सुदर्शन, दिलीप राय आणि रिंकू सिंह हे आमदार उपस्थित नव्हते. त्यामुळे अस्वस्थता आहे.
हे ही वाचा..
भारताचा पुन्हा भ्रमनिरास; १९ वर्षांखालील विश्वचषक ऑस्ट्रेलियाने हिरावला
ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीने ‘त्या’ विद्यार्थ्याला केले एका सत्रासाठी निलंबित
उत्तराखंड: हल्दवानी हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक पोलिसांच्या ताब्यात!
सिक्कीम येथील जत्रेत घुसला ट्रक, तीन ठार
बिहार विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. एकूण २४३ सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी १२२ आमदारांचे संख्याबळ आवश्यक आहे. सध्याच्या घडीला जेडीयु आणि भाजपाकडे मिळून १२८ आमदारांचे संख्याबळ आहे. तर, काँग्रेस, आरजेडी आणि डाव्या पक्षांकडे मिळून ११४ आमदारांचे पाठबळ आहे. दुसरीकडे एनडीएच्या बाजूचे सहा आमदार नॉट रिचेबल असून जीतनराम मांझी हे नितीश यांना साथ देण्यास तयार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपा आणि नितीश कुमार यांच्या गोटात अस्वस्थता असल्याचे सांगितले जात आहे.