डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हे पाश्चिमात्य देशांच्या संविधानातून घेतलेले नाही तर हे पूर्णपणे भारतीय तत्त्वज्ञान आहे. संविधानाची उद्देशिका आपली आहे. संविधानात ठिकठिकाणी बंधुता हे शब्द दिसतात. हे गौतम बुद्धांचे तत्वज्ञान आहे. संधीची समानता त्यांनी दिली. जात, धर्म यांच्या आधारे संधी दिली जाणार नाही. सर्वांना समान संधी दिली जाईल, हा संविधानाचा गाभा आहे, असे म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळातील संविधानावरील चर्चेत विविध पैलूंना स्पर्श केला.
ते म्हणाले की, लंकेतील सीतेची सुटकादेखील संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये दाखवलेली आहे. ती यासाठी दाखवलेली आहे की आम्हाला या संविधानाचा नारी सन्मानासाठी वापर करायचा आहे, हे त्यातून अभिप्रेत करण्यात आलेले आहे. गीतेचा उपदेश देखील याच संविधानात दाखवला आहे. या तत्त्वांवर उभं राहिलेलं हे संविधान आहे. या संविधानात सर्वात मोठी ठेव ही लोकशाही आहे.
भास्कर जाधव म्हणाले, भाषणाचे पुस्तक करा
त्यांचे हे सव्वातासाचे भाषण वेचक ठरले. अगदी उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही या भाषणाची तारीफ करत त्याचे पुस्तक तयार करा आणि त्याच्या प्रती आम्हाला द्या, अशी मागणीही केली.
फडणवीस म्हणाले की, तुम्ही बघा देशाच्या सर्व संस्थांना कलंकित करायचे, त्याच्यावर बोटे उचलायची, त्या संस्थांना एकप्रकारे अराजकाकडे न्यायचे हे सध्या षडयंत्र चाललेले आहे. आपल्याला सत्तेत येता येत नाही मग अशाप्रकारे देशाच्या संस्था बदनाम करायच्या. या संस्था आपण जेव्हा बदनाम करतो, तेव्हा आपण संविधानावर अविश्वास दाखवतो. कारण या संविधानाने या संस्था निर्माण केल्या आहेत. या संस्था इतक्या भक्कम करण्यात आल्या आहेत की, त्या कोणी तोडू शकणार नाही.
हे ही वाचा:
पाकिस्तानात राहतोय का? ‘आप’ आमदाराचा स्वतःच्या सरकारलाचं प्रश्न
उद्ध्वस्त होतील का २६७ शीश महल ???
सीबीआय टीमवर हल्ला, तीन अधिकारी जखमी
फडणवीस म्हणाले की, महात्मा गांधी नेहमी म्हणायचे रामराज्य आणायचे आहे. राजा जेव्हा भेदभाव करत नाही, त्याला रामराज्य म्हणतात. समाजातील छोट्या छोट्या लोकांना एकत्रित करून त्यांना शक्ती राजा देतो त्याला रामराज्य म्हणतात. हे पूर्णतः भारतीय मूल्यांवर तयार केलेले संविधान आहे. अशोक चक्र हे कायद्याचे व धर्माचे चक्र आहे. धर्म हे सातत्याने पुढे जाणारे गतीमान चक्र आहे. काळाच्या बरोबर चालण्याचे धैर्य दाखवले नाही, तर आपण पुढे जाऊ शकत नाही. भारतीय जीवन पद्धत ही संविधानाचा आत्मा आहे. संविधानाने मुलभूत हक्क आहेत. कायद्यासमोर समानता आहे. धर्म, भेद यावरून भेदभाव करता येणार नाही. सामाजिक समानता, समान संधी, आर्टिकल १५ मध्ये भेदभाव करता येणार नाही, असे बाबासाहेबांनी सांगितले. पण एखादा समाज जर मागे राहिला असेल तर शैक्षणिक आरक्षण तरतूद केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, १९७१साली मिसा कायदा आला. या कायद्याने मूलभूत अधिकार हिरावले गेले. तेव्हा जितेंद्र आव्हाडांना जेलमध्ये टाकण्याची संधी असती तर टाकता आले असते पण आता नाही. संविधान बचाव आज विरोधक म्हणत आहेत पण तेव्हा मूलभूत अधिकार हिसकावून घेण्यात आले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य काढून घेतले. अगदी किशोर कुमारांच्या गाण्यावरही बंदी घालण्यात आली.
फडणवीसांनी सांगितले की, भारतीय संविधानात ९९ बदल करण्यात आले आहेत. ४२वी घटनादुरुस्ती करण्यात आली, त्यामुळे देशाचे पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष न्यायालयाच्या कक्षेत येत नाहीत. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांच्याविरोधातील निकाल रद्द ठरवला. फडणवीस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिले तेव्हा ते सार्वभौम लोकतांत्रिक गणराज्य होते पण आणीबाणीच्या काळात त्यांनी समाजवाद, धर्मनिरपेक्ष हे शब्द संविधानात घुसडले. कारण या देशाचा मूळ आत्माच धर्मनिरपेक्ष आहे, हे बाबासाहेबांना माहीत होते.
आता संविधानमध्ये बदल झाला आहे. मसुदा वेळी ७ हजारांहून अधिक सुधारणा सुचविल्या होत्या. त्यातील २ हजार स्विकारल्या. त्यानंतर १०६ सुधारणा झाल्या. ओबीसी आयोगाला संविधान दर्जा, जीएसटी साठी झालेली सुधारणा ही नुकतीच झालेली आहे. महिलांना संसदेत व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याची सुधारणा आहे. देशाला दिशा देणाऱ्या या सुधारणा मोदी सरकारच्या काळात झाल्या आहेत. राजकीय नेते बदलले, राजकीय राजे बदलले. पण समाज एक राहिला. त्यातील पारंपरिक भाव एक राहिला. त्यामुळे राजकीय व्यवस्था तयार करायची होती, तेव्हा त्यावर नियंत्रण ठेवणारे संविधान तयार झाले. भारताची नीती काय, हे संविधानाची उद्देशिका सांगते
१९३५ चा कायदा हा एक प्रकारे संविधान होते. पण ते इंग्रजी राज्य चालवण्यासाठी भारतीय लोकांचा सहभाग असावा यासाठी होते. ते आपण संविधानात परावर्तित केले नाही. संविधानाने एकएक आर्टिकलवर चर्चा केली आहे. मग स्वीकार केला आहे. १६५ दिवस ही चर्चा झाली. ९ डिसेंबर १९४६ रोजी पहिली चर्चा तर २४ जानेवारी १९५० रोजी शेवटची चर्चा झाली. तीन वर्षे हे काम सुरु होते. जगाच्या पाठीवर सर्वात प्रदीर्घ काम ज्या संविधान सभेने काम केले ती ही भारताची संविधान सभा होती. ३८९ सदस्य यामध्ये होते. ९ डिसेंबर १९४६ ला पहिले अधिवेशन झाले. तेव्हा सुरुवात हा वंदे मातरम् गीताने झाली. आचार्य कृपलानी यांनी पहिले भाषण केले होते. एकट्या बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुतांश ड्राफ्ट तयार केला.म्हणून संविधानाचे शिल्पकार हे बाबासाहेब आंबेडकरांना मानतो”,