काँग्रेस महाविकास आघाडीत राहील असे वाटत नाही!

आमदार नितेश राणे यांचा मोठा दावा

काँग्रेस महाविकास आघाडीत राहील असे वाटत नाही!

जागावाटपावरून महाविकास आघाडीत जे रणकंदन माजले आहे, त्यावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे. या सगळ्या परिस्थितीत काँग्रेस फार काळ महाविकास आघाडीत राहील अशी शक्यता नाही, असा मोठा दावा त्यांनी केला आहे. पुढील ४८ तासात काँग्रेस एका निर्णायक भूमिकेत येईल, असे ते म्हणाले.

कणकवली येथे पत्रकारांशी बोलताना नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत यांनी काँग्रेस व उबाठामधील वादाबद्दल कितीही खोटे सांगितले, तरी महाविकास आघाडीमधून काँग्रेस बाहेर निघण्याच्या उंबरठ्यावर आहे. हे माझे वाक्य या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने नोंद करा. पुढील ४८ तासात काँग्रेस एका निर्णायक भूमिका घेण्याच्या मार्गावर आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरळसरळ जी भूमिका घेतली, ते मीटींगमधून उठून गेले. त्यावरून सारे काही आलबेल नाही हे स्पष्ट होते. विदर्भ, कोकण, मुंबईतल्या जागांबाबत त्यांच्या मनात नाराजी आहे. त्यांनी पुढील दोन दिवसांत काँग्रेस भूमिका घेईल, असे स्पष्टपणे राज्याच्या नेत्यांना कळवले आहे, अशी माझ्याकडे माहिती आहे. म्हणून मविआ शेवटच्या काही तासांपुरती आहे.

नितेश राणे म्हणाले की, मविआमध्ये उद्धव ठाकरे कुणालाही न विचारता, न विश्वासात घेता एबी फॉर्म वाटत आहेत, ज्या जागांवर फायनल चर्चा झालेली नाही तिथे उमेदवार घोषित करत आहेत. उदा भायखळा, हिंगोली, देवळाली. काँग्रेसला दुर्लक्षित करण्याचे काम ते करत आहेत. काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंबद्दल खाजगीत काय बोलत आहेत, ते जाहीर केले तर आमच्यासारख्या विरोधकांनाही लाज वाटेल, असे शब्द वापरले जात आहेत. म्हणून मविआमधून काँग्रेस बाहेर निघण्याचा निर्णय ९० टक्के झालेला आहे. काँग्रेसचे अस्तित्व संपविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे राहुल रागावलेले आहेत. त्याबद्दल काँग्रेस भूमिका घेणार हे मी खात्रीलायकरित्या सांगतो.

नितेश राणे यांनी सांगितले की, प्रथम मविआकडून ८५ -८५- ८५ असा फॉर्म्युला दाखवला. त्याचे गणित २७० दाखवले. पण १०० जागा उबाठाला मिळण्याची शक्यता नाही. आता ९० – ९० – ९० असा फॉर्म्युला सांगितला जात आहे. याला समन्वय म्हणणार का, त्यापेक्षा म्हणा की, काँग्रेसला संपवायचे आहे. कोकणातील काँग्रेसच्या सगळ्या कार्यालयांना टाळे मारा अशी स्थिती आज आहे. जिथे अंतुले निवडून येत असत. राणे काँग्रेसमध्ये होते, तेव्हा काँग्रेसची ताकद होती. त्याच काँग्रेसला एकही उमेदवार कोकणात दिलेला नाही.म्हणून आम्ही प्रदेश काँग्रेस कार्यालयाकडे टाळ्यांचा बॉक्स पाठवणार आहोत.

हे ही वाचा:

नामदेवराव जाधव यांचा ‘छत्रपती शासन’ हा नवा पक्ष!

बांगलादेशमध्ये पुन्हा संतप्त हिंदू एकवटला; सनातन जागरण मंचने केल्या ८ मागण्या

सात वर्षांच्या चिमुकलीवर सामुहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळले

महायुती अमित ठाकरेंना समर्थन देणार?

संजय राऊत विधानसभा निवडणुकीनंतर सरकार बनविण्याचे मनसुबे रचत असले तरी हे मुंगेरीलालचे हसीन सपने आहेत, असे सांगत नितेश राणे म्हणाले की, २९ तारीख अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. पण अजून याद्या फायनल होत नाहीत. गँगवॉर बंद होत नाहीत. जे तीन पक्ष जागावाटप शांततेत करू शकत नाहीत, ते उद्या महाराष्ट्र कसा सांभाळणार?

भाजपा संस्कारहीन पक्ष आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांना वापरण्यात आलेल्या अपशब्दांवरून नितेश राणे म्हणाले की,  स्वप्ना पाटकर यांच्याबद्दल संजय राऊत यांनी कोणती भाषा वापरली होती? त्यांचे ऑडिओ मी पाठवतो हवे तर. आपल्या जवळच्या माताभगिनींना कशी वागणूक ते देतात, हे आधी त्यांनी पाहावे.

 

Exit mobile version