“भाजपाला ‘मियाँ मुसलमान’ भागातून जागा मिळणार नाहीत.” असे विधान भाजपाचे आसाम सरकारमधील ज्येष्ठ मंत्री हिमांता बिस्व सर्मा यांनी केले आहे. “मियाँ मुसलमानांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक आणि पंचायत निवडणुकीसाठी भाजपाला मतदान केले नव्हते.” असे हिमांता बिस्व सर्मा यांनी सांगितले.
“मुसलमान आम्हाला मतदान करत नाहीत. हे मी माझ्या अनुभवाच्या आधारावर सांगतोय. त्यांनी २०१४ लोकसभा निवडणूक आणि पंचायत निवडणुकांमध्येही भाजपाला मतदान केले नाही. भपजाला त्यांच्या जागांवर मतं मिळणार नाहीत तर, बाकीच्या जागा या आमच्या आहेत.” असे सर्मा यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले.
#WATCH | "Miya Muslims don't vote for us (BJP), I'm saying this on the basis of experience,they didn't vote us in Panchayat & 2014 Lok Sabha polls. BJP will not get votes in seats that are in their hands,while other seats are our…"said Assam Minister HB Sarma in Assamese (30.1) pic.twitter.com/uGLSgkD1iG
— ANI (@ANI) January 31, 2021
“जोपर्यंत समाजाला घातक असलेल्या तिहेरी तलाक सारख्या प्रथा आणि धर्मवेडाने ग्रासलेला त्यांचा समाज आहे तोपर्यंत आम्हाला त्यांची मतं नकोत.” असेही त्यांनी सांगितले.
“त्यांचा स्वतःचा अजेंडा आहे. ते आम्हाला मतदान करत नाहीत. आम्ही शंकरदेव कलाक्षेत्राला ‘मिया म्युझिअम’ बनू देणार नाही. आम्ही त्यांना ‘मियाँ पोएट्री’ लिहू देणार नाही.” असेही हिमांता बिस्व सर्मा म्हणाले.
“आम्ही काही मुस्लिम बहुल भागात मुस्लिम उमेदवार देऊ पण ते जिंकणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. परंतु ते आमचे कार्यकर्ते आहेत आणि आमच्या कार्यकर्त्यांना त्या जागांवर आमच्या उमेदवाराला मतदान करता यावे म्हणून आम्ही हे उमेदवार उभे करत आहोत. अन्यथा त्यांना केवळ काँग्रेस आणि एआययूडीएफ यांच्यातील पर्याय निवडावा लागेल.” अशी माहिती सर्मा यांनी दिली.