छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर लता मंगेशकर यांचे स्मारक व्हावे, या मागणीवरून राज्यात सध्या राजकारण सुरू आहे. या वादावरून मंगेशकर कुटुंबियांकडून त्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. लता दीदींच्या स्मरकावरून होणारे राजकारण थांबवावे, असे आवाहन लता मंगेशकर यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी मंगेशकर कुटुंबियांच्या वतीने केले आहे.
पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले की, दीदींच्या स्मारकावरून राज्यात जो वाद सुरू आहे, तो राजकारण्यांनी थांबावावा. दीदींच्या बाबतीत कोणतेही राजकारण करू नये. आम्ही मंगेशकर कुटुंबियांनी या वादात भाग घेण्याचे काहीही कारण नाही. कारण दीदींचे स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावं ही आमची इच्छाच नाही.
आंतरराष्ट्रीय संगीत विद्यापीठाची स्थापना हीच लतादीदींना खरी श्रद्धांजली आहे. शासनाने लता मंगेशकर संगीत विद्यालय स्थापन करण्याचे आश्वासन लता दीदींना दिले होते. तसेच या संदर्भात स्वत: लता मंगेशकर यांनी सरकारकडे विनंती केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री उदय सामंत, मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही विनंती मान्य करून त्या संदर्भात पूर्वतयारी केलेली आहे. त्यामुळे दीदींचे संगीत स्मारक तयार होत आहेत यापेक्षा अन्य कोणतेही मोठे स्मारक होऊ शकत नाही.
हे ही वाचा:
हिजाब वादावरून दोन नेत्यांची भिन्न मते…बिघडले महाराष्ट्र महाविकास आघाडीचे सरकार?
बूट पॉलिश करणारे रेल्वेविरोधात आक्रमक…. CSMT स्थानकात कर्मचाऱ्यांचे आंदोलन
भारत वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश देणार?
एका तासात त्यांनी चोरले होते एक डझन मोबाईल…
भारतरत्न लता मंगेशकर यांची ६ फेब्रुवारी रोजी प्राणज्योत मालावली. साऱ्या जगताची दीदी हिच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे. ही आकाशाएवढी नाही तर अवकाशाऐवढी आहे. त्या अवकाशाच्या पोकळीत अनेक गंगा जरी ओतल्या तरी पोकळी कधीही न भरणारी आहे. लता मंगेशकर गेल्याने एक संगीत पर्व नाही तर एक युगांत झाला आहे, अशा भावना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केल्या.