सध्या कर्नाटकात दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे रणनितीकार अमित शहा यांनी दौरा संपता संपता प्रत्येक छोट्या-मोठ्या बाबींसाठी दिल्लीत यायची गरज नाही अशा कानपिचक्या दिल्या आहेत.
बेळगाव येथे एका बैठकीत पक्षातील इतर नेत्यांसोबत बोलताना शहा यांनी सांगितले की, पक्षातील स्थानिक पातळीवरील अडचणी स्थानिक पातळीवरच सोडवाव्यात. त्यासाठी तुम्ही विकेंद्रीकरणाची पद्धत लवकरात लवकर तयार करा. गाव पातळीवरील अडचणी गावातच सोडवल्या जाव्यात, जिल्हा पातळीवरील अडचणी जिल्हा पातळीवर सोडवाव्यात, राज्य पातळीवरील अडचणी राज्य पातळीवर सोडवाव्यात. त्यासाठी प्रत्येक वेळेला दिल्लीला येण्याची गरज नाही. अशा कानपिचक्या अमित शहा यांनी दिल्या आहेत.
अमित शहांनी हे वक्तव्य आमदार अभय पाटील यांच्या एका तक्रारी बाबत बोलताना केले होते. अभय पाटील यांनी म्हटले होते, की पक्षासाठी कित्येक दशके काम केलेल्या लोकांना योग्य त्या प्रमाणात मोबदला मिळाला नाही. शहांनी हे विधान नाकारले. त्यावर, हे प्रश्न राज्यपातळीवरच सोडवा असा सल्ला देखील दिला.