ठाकरे सरकारने कोविडचे कारण पुढे करत सर्वसामान्यांना लोकलप्रवास बंद केला होता. त्यामुळे अनेक नोकरदारांचे हाल झाले. याबद्दल जनतेमधून संताप व्यक्त केला जात आहे. अशा प्रकारचा संताप व्यक्त करणारा एक व्हिडिओ एका महिलेने प्रसिद्ध केला आहे. या विरोधात भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
लोकल प्रवासासाठी करोना प्रतिबंधक लशीच्या दोन डोस घेणाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. १५ ऑगस्टपासून दोन डोस घेतलेल्यांना लोकल ट्रेनने प्रवास करता येणार आहे. मात्र जवळजवळ मागील दीड वर्षांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेनच्या प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. असं असलं तरी अनेकजण जमेल त्या पद्धतीने तिकीटं काढून ट्रेनने प्रवास करताना दिसत आहेत. अशा तऱ्हेने प्रवास करणाऱ्या एका महिलेवर ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला. मात्र त्यावेळी या महिलेने व्हिडिओ काढत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. आमदार अतुल भातखळकरांनी हा व्हिडिओ ट्वीट करताना ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
अतुल भातखळकरांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत म्हटले आहे की,
अजिबात लाज वाटून घेऊ नका मुख्यमंत्री महोदय, तुम्ही एकदम ब्येष्ट आहात. “मुख्यमंत्री तुम्हाला लाज वाटली पाहिजे”; लोकल प्रवासात झालेल्या कारवाईमुळे महिलेचा संताप
अजिबात लाज वाटून घेऊ नका मुख्यमंत्री महोदय, तुम्ही एकदम ब्येष्ट आहात.
Video: "मुख्यमंत्री तुम्हाला लाज वाटली पाहिजे"; लोकल प्रवासात झालेल्या कारवाईमुळे महिलेचा संतापhttps://t.co/XpZg9YjITNhttps://t.co/GMWJxdFb5s
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 12, 2021
या महिलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर अडवले होते. या महिलेला रेल्वेने ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र या महिलेने दंड भरण्यास नकार देत तुम्ही माझ्यावर कारवाई करा असं सांगितलं. “माझ्याकडे ५०० रुपये नाहीयत,” असं म्हणत नंतर ही महिला लाइव्ह व्हिडीओमध्येच आजूबाजूच्या प्रवाशांकडे, “मला पैसे द्या सगळ्यांनी माझ्याकडे पैसे नाहीयेत,” असं म्हणू लागली. त्यानंतर एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने, “मॅडम तुम्ही शूट करु शकत नाही” असं सांगितल्यानंतर या महिलेने, “तुम्ही माझे हक्क काढून घेऊ शकत नाही,” असं म्हणत फेसबुक लाइव्ह सुरुच ठेवलं.
“माझ्याकडे ५०० रुपये नाहीत माझ्यावर कारवाई करा. मला किती वेळ बसवायचंय बसवा. आता तर मी मास्क पण नाही लावणार. त्याचा पण दंड मी भरणार नाही,” असे देखील या महिलेने पुढे म्हटले आहे. त्यानंतर ओरडून या महिलेने, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ऐकावं की हा महिलांवर होणार अत्याचार आहे. माझ्याकडे पैसे नाहीत मी दंड भरणार नाही. माझ्याकडे पैसे नाहीत या सरकारने माझ्यावर कारवाई करावी. या सरकारचा निषेध आहे. उद्धव ठाकरेंचा पण निषेध आहे. अशाप्रकारे महिलांना वेठीस धरणे चुकीचं आहे. आम्ही नोकरी नाही केली तर पैसे आणणार कुठून?,” असा प्रश्न उपस्थित केला.
“या सरकारचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा धिक्कार आहे. मुख्यमंत्री तुम्हीच बघा ही परिस्थिती. तुम्ही प्रेमाने बोलताय ना, गोड बोलताय ना मग सांगा मला की माझ्याकडे दंडाचे पैसे नाहीत तर मी ते भरणार कुठून. माझ्याकडे मास्कच्या दंडाचे पैसेही नाहीत भरायला. बघू द्या माझ्यावर किती केसेस होतात,” असे देखील ही महिला बोलताना दिसत आहे.