कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा कल हा काँग्रेसकडे दिसत असून सध्या १३३ जागांसह काँग्रेस आघाडीवर आहे. तर, भाजपा ६५ जागांसह दुसऱ्या स्थानी आहे. काँग्रेसला बहुमत मिळाल्याचे चित्र असताना काँग्रेसने सर्व विजयी उमेदवारांसाठी ५ स्टार हॉटेलमध्ये ५० खोल्या बुक केल्याची माहिती समोर आली आहे.
काँग्रेसने बंगळुरूमधील ५ स्टार हिल्टन हॉटेलमध्ये ५० खोल्या बुक केल्या आहेत. तसेच विजयी आमदारांना रात्री ८ वाजेपर्यंत हॉटेलमध्ये पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, कर्नाटकातील तीन हवाई पट्टीवर काँग्रेसने छोटी विमाने तैनात केली असल्याची माहिती असून पक्षाच्या राज्यस्तरीय जबाबदार नेत्यावर आमदारांना घेऊन आणण्याची हबदारी देण्यात आली आहे. तर फक्त जवळच्या आमदारांनाच रस्त्याने आणलं जाणार असून काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे, अशी माहिती आहे.
मात्र, यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विजयी जागांची संख्या जास्त असतानाही आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची वेळ काँग्रेसवर का आली आहे? विजयी आमदार फुटतील ही भीती काँग्रेसमध्ये आहे का? स्वतःच्या पक्षातील आमदारांवर वरिष्ठ नेत्यांना विश्वास नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हे ही वाचा:
मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बोलावणारा वैमानिक निलंबित; ३० लाखांचा दंड
खगोल भौतिकशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांना जीवनरगौरव पुरस्कार
‘स्टारबक्स’च्या त्या नव्या जाहिरातीने ओढवला वाद; बहिष्कार ट्रेंडिंगमध्ये
फक्त राजीनामा नाही, ही चूक सुद्धा उद्धवना भोवणार!
दरम्यान, काँग्रेसचा विजय झाल्यास मुख्यमंत्री कोण? असा सवाल उपस्थित होत असून आम्हांला कुणाच्याही पाठिंब्याची गरज नाही, अशी भूमिका काँग्रेसने स्पष्ट केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस १४० हून अधिक जागा जिंकून सरकार स्थापन करेल, असा दावा कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डी के शिवकुमार यांनी केला आहे. तसेच, पक्ष जो निर्णय घेईल तो त्यांना मान्य असेल, असेही त्यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल सांगितले.