प्रत्येक राज्याचे नाव अर्थसंकल्पात घेणे शक्य नसते हे काँग्रेसला कळत नाही?

अर्थसंकल्पातून काही राज्यांवर भेदभाव केल्याच्या आरोपाला अर्थमंत्र्यांनी दिले सडेतोड उत्तर

प्रत्येक राज्याचे नाव अर्थसंकल्पात घेणे शक्य नसते हे काँग्रेसला कळत नाही?

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवार, २३ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केला. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात काही राज्यांच्याबाबतीत भेदभाव केल्याचा आरोप करत लोकसभेत जोरदार घोषणाबाजी केली. शिवाय राज्यसभेतून विरोधकांनी सभात्याग केला. मोदी सरकारने अर्थसंकल्पातून काही राज्यांच्याबाबतीत भेदभाव केला आहे, असा आरोप काँग्रेसने केला. या पार्श्वभूमीवर राज्यसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उत्तर दिले.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, अर्थसंकल्पात कोणत्याही राज्याकडे दुर्लक्ष केले गेले नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष जाणीवपूर्वक नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या भाषणानंतर काही वेळातच विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेतून सभात्याग केला.

“प्रत्येक अर्थसंकल्पात, तुम्हाला देशातील प्रत्येक राज्याचे नाव घेण्याची संधी मिळत नाही. मंत्रिमंडळाने वाढवण बंदर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्या प्रकल्पासाठी ७६ हजार कोटी जाहीर केले आहेत. मात्र, कालच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राचे नाव घेण्यात आले नाही. याचा अर्थ महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केले आहे असे होत नाही. अर्थसंकल्पीय भाषणात एखाद्या विशिष्ट राज्याचे नाव घेतले नाही तर, भारत सरकारचा कार्यक्रम या राज्यांमध्ये जात नाही असा अर्थ होतो का? आपल्या राज्यांना केंद्राने काहीही दिलेले नाही, असा जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांचा हा मुद्दाम प्रयत्न असून हे अत्यंत निंदनीय आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया निर्मला सीतारमण यांनी दिली.

हे ही वाचा:

काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कोसळले, १८ जणांचा मृत्यू !

जरांगे पाटलांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी !

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा; एक जवान हुतात्मा

मालाडच्या तपोवन मंदिरातील मठाधिपतींवर प्राणघातक हल्ला !

विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर राज्यसभेत संबोधित करताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, “विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे त्यांचे मत मांडण्यासाठी उभे राहिले. परंतु, माझं मत ऐकण्यासाठी ते थांबले नाहीत. लोकशाहीच्या सन्मानार्थ तरी त्यांनी इथे थांबायला हवे होते. या देशात काँग्रेस पक्ष बराच काळ सत्तेत आहे. त्यांनी खूप वेगवेगळे अर्थसंकल्प सादर केले आहेत. त्यामुळे त्यांनाही कळलं पाहिजे की प्रत्येक अर्थसंकल्पात प्रत्येक राज्याचं नाव घेता येणं शक्य नाही,” असं स्पष्टीकरण देत निर्मला सीतारमण यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

Exit mobile version