सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून प्रचार कामांना वेग आला आहे. महाराष्ट्रातही सभांचा धडाका सुरू असून रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे. अशातच नारायण राणे यांच्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह हे प्रचारसभेसाठी कोकणात आले होते. यावेळी त्यांनी सभेला संबोधित करतानस ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा नकली शिवसेना असा उल्लेख करत ठाकरेंवर हल्लाबोल केला.
“नकली सेनेचे उद्धव ठाकरे यांच्यात वीर सावरकर यांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत आहे का? सावरकरांचे नाव घेण्याची हिंमत तुमच्यात नाही तर तुमची कसली शिवसेना. तुमची तर नकली शिवसेना आहे,” असे म्हणत अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या दादागिरीसमोर भरपूर संघर्ष केला आहे. भाजपाने खूप मोठा चेहरा कोकणासाठी दिला आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड बहुमताने जिंकवण्याचं काम करा”, असं आवाहनही त्यांनी केलं.
अमित शाह असे म्हणाले की, “उद्धव ठाकरेंना विचारायचे आहे की, तुम्हाला मुख्यमंत्रिपद हवे आहे की, आर्टिकल ३७० हटवणाऱ्याला विरोध करणारी काँग्रेस-राष्ट्रवादी पाहिजे. जे राहुल गांधी आणि शरद पवारांना शरण जातील, ते महाराष्ट्राचा गौरव सांभाळू शकणार नाहीत. १० वर्षात सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांची सत्ता होती. पाकिस्तानी लोक देशात घुसत होते. मनमोहनसिंग मौन राखत दिल्लीत बसत होते. त्यांना व्होट बँकेची चिंता होती. त्यांची व्होट बँक कोण आहे माहिती आहे ना?” असा सवाल अमित शाह यांनी विचारात उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे.
हे ही वाचा:
केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाचा विचार केला जाऊ शकतो…
आमदार किरण सरनाईकांच्या भावाच्या कारला अपघात, पाच जणांचा मृत्यू!
ऑनलाईन फसवणुकीसाठी गुन्हेगार लढवत आहेत नवी शक्कल!
‘सीबीआय’ भारतीय संघराज्याच्या नियंत्रणाखाली नाही
“दहा वर्षांपूर्वी मनमोहन सिंग यांच्या काळात भारताची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावर होती. गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी ही अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा मतदान केल्यास हीच अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर येणारी आहे,” असं अमित शाह म्हणाले. पायाभूत सुविधांसाठी अनेक प्रकल्प नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रासाठी दिले आहेत. गुंतवणुकीत भारताने महाराष्ट्राला नंबर वन बनवण्याचं काम केलं. हे लोक देशाचा विकास नाही करू शकत नाही. देशाला सुरक्षित नाही ठेवू शकत. देशाला एक ठेवू शकत नाही. देशाच्या समस्या सोडवू शकत नाहीत. देशाला समाधान नाही करू शकत. हिंदूंच्या समाधानासाठी काही करू शकत नाहीत, असं म्हणत अमित शाह यांनी विरोधकांवर टीका केली.