गेले दोन महिने दिल्लीच्या सीमेवर चालू असलेल्या आंदोलनाने वेगळे वळण घेतले आहे. इतके दिवस असलेली एकी कालच्या प्रसंगाने तुटली आहे. या आंदोलनातून दोन शेतकरी संघटना मागे हटल्या आहेत.
या आंदोलनातून ऑल इंडिया किसान संघर्ष कोऑर्डिनेशन कमिटी या संघटनेचे नेते सरदार व्ही एम सिंग यांनी येऊ घातलेल्या तीन कृषी सुधारणा कायद्यांच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनातून आपली संघटना माघार घेत असल्याचं जाहिर केलं आहे. मंगळवारी, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीच्या वेळी दिल्लीत उफाळलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ हे पाऊल उचलत असल्याचे सिंग यांनी सांगितले आहे.
या संघटनेसोबतच आणखी एक संघटना देखील या आंदोलनातून बाहेर पडली आहे. भारतीय किसान युनियन (भानू) या संस्थेने देखील आंदोलनातील आपला सहभाग काढून घेतला आहे. चिल्ला सीमा येथे चालू असलेल्या आंदोलनातून ही संघटना बाहेर पडली आहे.
सरदार व्ही एम सिंग यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे, की नेत्यांचे मनसुबे वेगळे असलेले आंदोलन आम्ही अधिक चालवू शकत नाही. त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो, परंतु व्ही एम सिंग आणि ऑल इंडिया किसान संघर्ष कोऑर्डिनेशन कमिटी या आंदोलनाला असलेला आपला पाठिंबा तात्काळ काढून घेत आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्हाला हमीभावाची खात्री दिली जात नाही तोवर आमचे आंदोलन चालूच राहिल परंतु माझ्यासोबत ते या मार्गाने चालणार नाही. आम्ही इथे लोकांना मारून घेण्यास अथवा हुतात्मा होण्यास आलो नाही.
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत उफाळलेल्या हिंसाचाराविषयी बोलताना सरदार व्ही एम सिंग म्हणाले की माझे राकेश टिकैट प्रतिनिधत्व करत असलेल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या आंदोलनाशी काही देणे- घेणे नाही.