सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा

सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा

तौक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही फटका बसल्याने केंद्राने राज्याला आर्थिक मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यावर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. उद्धवजींनी केंद्राकडे सारखे मदतीचे रडगाणे गात बसू नये. त्यापेक्षा राज्य सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा. राज्य चालवण्याची आमची क्षमता नाही, असं थेट केंद्राला सांगा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे

नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. कोल्हापूरमध्ये आलेल्या आपत्तीच्यावेळी केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारनेही मदत केली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सारखं केंद्राकडे मदतीचे रडगाणे गात बसू नये. कालपासून राज्यातील सर्वच मंत्री केंद्राच्या मदतीची टेप वाजवत आहेत. त्यापेक्षा केंद्र सरकारला राज्य सरकार बरखास्त करायला सांगा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा. राज्य चालवण्याची आमची क्षमता नाही हे केंद्राला कळवा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकारने कोकणाला पॅकेज द्यावे जेणे करून कोकणाला आधार मिळेल. केंद्र सरकारला देश चालवायचा आहे. राज्य सरकारने आपली मदत जाहीर करावी आणि ती मिळावी सुद्धा. निसर्ग चक्रीवादळावेळी राज्य सरकारने २५ कोटींची मदत जाहीर केली. पण अजूनही एकही दमडी आली नाही. तसे यावेळी होता कामा नये. मुख्यमंत्री मदतीची घोषणा करतील, पण ती मदत मिळेल असे मला वाटत नाही, असं सांगतानाच काल मुख्यमंत्री कोकणातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळून मुंबईला परत गेले, अशी टीकाही त्यांनी केली.

हे ही वाचा:

ठाकरे सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतंय?

पांडू हवालदार फेम, जेष्ठ संगीतकार विजय पाटील यांचे निधन

आंध्रातील नेल्लोरमध्ये कोरोनावर आयुर्वेदिक औषध?

२०२१ च्या अखेरपर्यंत सर्व प्रौढांचे लसीकरण करणार

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दौऱ्याला दौरा कसं म्हणणार? असा सवालही त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री नुकसान झालेल्या भागात गेले तरी का? नुकसानग्रस्त गावकऱ्यांशी बोलले का? त्यांचे अश्रू तरी पुसले का?, मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष काय बघितलं? मालवणमध्ये वायरी गावात लोक सकाळी ७ वाजल्यापासून त्यांची वाट पाहात होते. तिथे त्यांनी कुणाच्या खांद्यावर हात ठेवला? कुणाचे अश्रू पुसले? मुख्यमंत्री हवाई दौरा न करता जमिनीवर उतरले, त्याचा फायदा काय झाला आम्हाला? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. मुख्यमंत्री वायरीत गेले नाहीत, निवतीत गेले नाहीत. ज्या भागात सर्वात जास्त नुकसान झाले त्या वैभववाडी, देवगडकडे ढुंकूनही पाहिले नाही. मुळात याला दौरा म्हणू शकता का?, संतप्त सवालही त्यांनी केला. मुख्यमंत्री एखाद्या भागात येतात तेव्हा जनतेच्या त्यांच्याकडून फार अपेक्षा असतात. हे दुःख वाढवणारे मुख्यमंत्री आहेत, दुःख पुसणारे नाहीत, अशी खरमरीत टीका त्यांनी केली.

Exit mobile version