जयप्रभा स्टुडिओमध्ये लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्यावरून वाद

जयप्रभा स्टुडिओमध्ये लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्यावरून वाद

कोल्हापुरमधील जयप्रभा स्टुडिओमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्यात यावे या मागणीवरून कोल्हापूरमध्ये आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. मात्र, या स्टुडिओची खरेदी स्थानिक शिवसेना नेत्याच्या मुलांसह काही बड्या व्यापाऱ्यांनी केल्याने आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. दरम्यान जयप्रभा स्टुडिओ वाचवण्याच्या मागणीसाठी १३ फेब्रुवारी रविवारपासून स्टुडिओच्या दारात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्यावतीने बेमुदत उपोषण सुरू केले जाणार आहे.

जयप्रभा स्टुडिओच्या जागेवर लता मंगेशकर यांचे स्मारक करण्याची मागणीही होत आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्टुडिओत लता मंगेशकर यांचे स्मारक करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. याशिवाय आणखीही काही संस्थांनी ही अशी मागणी केली आहे. तर, मला वाचवा…, असा आशय व्यक्त करून जयप्रभा स्टुडिओ वाचण्यासाठी कोल्हापूरकरांनी, कलाकारांनी एकजूट राखावी, असे संदेश सोशल मीडियामध्ये झपाट्याने व्हायरल होत आहेत.

दरम्यान जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणासाठी तत्काळ उपलब्ध करावा, चित्रीकरण व्यतिरिक्त कोणत्याही व्यवसायिक वापर होऊ नये, स्टुडिओचे जतन होण्यासाठी शासनाने लक्ष घालावे या मागणीसाठी स्टुडिओच्या दारात बेमुदत उपोषण करणार असल्याचे, शनिवारी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

“कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर राजकीय बदनामीसाठी हे षडयंत्र रचले आहे. स्टुडिओ शासनाने ताब्यात घ्यावा. स्थापत्य अभियंता असलेला मुलगा ऋुतुराज याला खासगी जागा विकत घेण्याचे अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे. या खरेदीशी आपला संबंध नाही.”, असे शिवसेनेचे माजी आमदार आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

Tata IPL 2022 Mega Auction: ‘या’ होत्या पहिल्या दिवशीच्या महत्वाच्या घडामोडी

दुसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी काँग्रेसला आणखी एक धक्का

बायडन-पुतीन यांच्यात फोनवरून होणार ‘युक्रेन पे चर्चा’

आयपीएल लिलावादरम्यान ऑक्शनर ह्यू एडमिट्स कोसळले

कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओची उभारणी चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांनी केली. पुढे हा स्टुडिओ लता मंगेशकर यांनी विकत घेतला होता. या स्टुडीओमधील काही जागेची विक्री अगोदरच झालेली आहे. तर उर्वरित जागेची विक्री दोन वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. शिवसेनेचे माजी आमदार आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या दोन मुलांचा समावेश खरेदीदारांमध्ये आहे. ही माहिती समोर येताच कोल्हापुरात वाद सुरू झाला आहे.

Exit mobile version