महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी मधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि शिवसेना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कामावर समाधानी नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात बैठक होत असल्याचे समजते.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून गृह खात्याचा कारभार हा कायमच चर्चेचा विषय ठरला आहे. परमबीर सिंह, सचिन वाझे यांच्यामुळे गृह खात्याची अब्रू धुळीला मिळाली. तर थेट माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी सध्या कोठडीत आहेत. त्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृह खात्याची सूत्रे आली.
हे ही वाचा:
श्रीलंकेत आर्थिक संकटाचा निषेध; राजधानी कोलंबोत कर्फ्यू
किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर; अनिल परबांनंतर हसन मुश्रीफ यांचा नंबर
‘श्रेयवादाच्या नादात अपयशाचं खापर ठाकरे सरकारवर फुटेल’
‘गरीब नवाज चाहे तो हिंदुस्तान का पता ना चले’…कव्वाली गायक नवाज शरीफची मुक्ताफळे! गुन्हा दाखल
पण दिलीप वळसे-पाटील हे प्रभावी कामगिरी करू शकले नाहीत. एकीकडे ईडी, आयकर विभाग यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मागे हात धुऊन लागलेले असतानाच राज्यातील गृहखाते भाजपाच्या विरोधात काहीच करताना दिसत नाहीये. यामुळे काँग्रेस आणि शिवसेना नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत भाजपा नेत्यांवर अनेक आरोप केले. पण या आरोपांचे पुढे काहीच झाले नाही. राज्याचे पोलीस हे सरकारला अपेक्षित असलेली कारवाई भाजपा नेत्यांच्या विरुद्ध करताना दिसतात नाहीयेत. त्यामुळेच दिलीप वळसे-पाटील यांच्यावर नाराजी असल्याचे समजते. त्यामुळे आता महाराष्ट्राला आणखी कोणी नवे गृहमंत्री मिळणार का? याची देखील चर्चा सुरू झाली आहे.