काल मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांवरील आरोपांच्या तपासणीच्या संदर्भातील याचिकेवर सुनावणी घेताना, ही तपासणी सीबीआयकडून व्हावी असे सांगितले. त्यामुळे अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजिनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून दिलीप वळसे-पाटिल हे पदभार सांभाळणार असल्याचे कळले आहे. त्याचवेळी सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होत आहे. यात उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांचा समावेश असल्याचे कळले आहे.
हे ही वाचा:
नरेंद्र मोदींचे नागरिकांना पंचभाषिक आवाहन
सीबीआयचे पथक होणार मुंबईत दाखल
देशमुख लगबगीने दिल्लीला..अभिषेक मनू सिंघवींच्या घरी
अनिल देशमुख यांचा राजिनामा स्वीकारावा अशी विनंती करणारे पत्र मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवले आहे. त्याबरोबरच हे पद दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावे आणि त्यांच्याकडील कामगार विभागाचा अतिरिक्त भार हसन मुश्रीफ यांच्याकडे तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त भार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित देशमुख यांच्याकडे सोपवावा अशी विनंती देखील या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी घेताना उच्च न्यायालयाने यात सीबीआयने प्राथमिक तपासणी करावी. या तपासणीत दोषी आढळल्यास एफआयआर दाखल करावा असा निर्णय दिला. त्याबरोबरच पदावर असताना गृहमंत्र्यांची निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही असे निरीक्षण देखील न्यायालयाने नोंदवले होते. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर राजिनामा देत असल्याचे अनिल देशमुखांनी सांगितले होते.