अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांचे विश्वासू दिलीप वळसे-पाटील हे गृहमंत्रीपदाचा कारभार हाती घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या निवडीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. आज संध्याकाळपर्यंत शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर उद्या दिलीप वळसे-पाटील तातडीने या खात्याची सूत्रे हाती घेतील, असे समजते.
सुरुवातीला अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहखाते काही काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राहील, असे म्हटले जात होते. मात्र, गृहखात्यासारखे संवेदनशील आणि सामर्थ्यशाली खाते राष्ट्रवादी इतर कोणाच्याही ताब्यात द्यायला तयार नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीकडून तातडीने अनिल देशमुख यांचा उत्तराधिकारी कोण, हे ठरवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
हे ही वाचा:
अनिल देशमुखांचा राजीनामा हे केवळ हिमनगाचं टोक
उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर अनिल देशमुखांचा राजीनामा?
अक्षय कुमार पाठोपाठ विकी कौशललाही कोरोनाची लागण
दुसरीकडे शरद पवार यांचे आणखी एक विश्वासू सहकारी हसन मुश्रीफ यांचे नावही गृहमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा होती. त्यासाठी हसन मुश्रीफ तातडीने मुंबईला रवाना झाल्याचेही सांगितले जात होते. मात्र, आता त्यांचा विचार गृहमंत्री नव्हे तर कामगार मंत्रालयासाठी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. हे खाते पूर्वी दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे होते. तर दिलीप वळसे-पाटील यांच्याकडील उत्पादन शुल्क खात्याचा कारभार हा अजित पवार स्वीकारतील, अशी सूत्रांची माहिती आहे.