वरळीत कोळी महिलांना मासे विक्री करण्यास अडचणी

मनसे विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांनी केली तक्रार

वरळीत कोळी महिलांना मासे विक्री करण्यास अडचणी

वरळीतील काही भागात उच्चभ्रू लोक मोठ्या- मोठ्या इमारतीत राहत असून तेथील स्थानिकांना पोटापाण्यासाठी त्या परिसरात व्यवसाय करू देत नाही, अशी तक्रार मनसे विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांनी माध्यमांशी संवाद साधताना केली आहे. बड्या अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पालिकेची माणसे काम करत असल्याचेही ते म्हणाले.

वरळी येथे गेल्या काही वर्षात उच्चभ्रू  लोकांची वस्ती वाढली आहे. बडे बडे अधिकारी या इमारतींमध्ये राहायला आहेत. दरम्यान वरळीमधील स्थानिक त्यांच्या पोटापाण्यासाठी करत असलेल्या व्यवसायांना यांच्याकडून विरोध होत असल्याचे संतोष धुरी यांनी म्हटले. इथल्या महिला अर्थार्जनासाठी छोटा मोठा व्यवसाय करतात. बुधवार, शुक्रवार, रविवार तीन दिवस या महिला दोन, तीन तासांसाठी मासे विकण्यासाठी बसतात. त्यानंतर त्या परिसर स्वच्छ करून निघून जातात. मात्र, या इमारतीमधील आयपीएस अधिकाऱ्याने थेट महापालिकेत फोन करून पालिकेच्या कर्मचाऱ्यांना या महिलांना हटविण्यास सांगितले.

हे ही वाचा:

चांद्रयान- ३ मोहिमेचा प्रवास मोठ्या पडद्यावर दिसणार

जादवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्याच्या मृत्यूमागे रॅगिंग हेच कारण

विजयाच्या चंद्रपथावर चालण्याचा हा क्षण!

चांद्रयानात इस्रोकडून एआय तंत्रज्ञानाचा वापर

वरळीमधील स्थानिक आधीपासून हा व्यवसाय करत असून इमारती नव्याने उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे या इमारतींमधील बड्या लोकांनी पालिकेच्या कामात लक्ष घालू नये, असं धुरी म्हणाले. नगरसेवक नसल्याने इतर लोक या कामांमध्ये ढवळाढवळ करत असल्याची टीका संतोष धुरी यांनी केली. तसेच ते म्हणाले की, आयपीएस अधिकाऱ्याकडून महापालिकेला फोन गेला. तिथून दबाव पडताच वॉर्ड अधिकाऱ्याला फोन गेले. शिवाय या स्थानिकांकडे सर्व पावती आणि कागदपत्रे असूनही ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे पुन्हा पालिकेची गाडी येऊन कारवाई करत असल्यास गाडी फोडू असा इशारा त्यांनी दिला आहे.

Exit mobile version