कर्नाटकचा हिजाब वाद आता महाराष्ट्राभर पोहोचला आहे. मालेगाव, पुणे तसेच इतर ठिकाणी समर्थन आणि विरोधाची निदर्शने सुरू झाली आहेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे याबाबत सरकारची भूमिका जनतेला कळलेली नाही.
शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले असून, शैक्षणिक संस्थांमध्ये गणवेश घालणे योग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली आहे. याप्रकरणी संघाने राजकारणाचा आरोप केला आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हिजाबच्या वादावर म्हटले आहे की, विद्यार्थ्यांनी शाळा आणि महाविद्यालयाने ठरवून दिलेला गणवेश परिधान करावा. शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणालाच महत्त्व दिले पाहिजे. धार्मिक किंवा राजकीय मुद्द्यांपेक्षा विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
काय म्हणाले नवाब मलिक?
काय खावे आणि काय परिधान करावे हे ठरवणे हा जनतेचा मूलभूत अधिकार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. डोके झाकणे हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे, मग तो हिजाब असो वा बुरखा. भाजप आणि संघ याचे राजकारण करत आहेत. लोकांनी काय खावे आणि काय घालावे हे भाजप आणि आरएसएस ठरवतील का? मुस्लीम मुली शाळा-कॉलेजात जातात, शिक्षण घेतात, ही समस्या आहे का? तसेच बेटी पढाओ या नारेबाजीचे काय झाले? असे प्रश्न नवाब मलिक यांनी केले आहेत.
हे ही वाचा:
सचिन वाझे अनिल देशमुखांविरुद्ध साक्ष देणार; ईडीला लिहिले पत्र
अशक्य केले शक्य!…पंतप्रधानांनी केले मुख्यमंत्री योगींचे भरभरून कौतुक
रुपेरी पडद्यावर उलगडणार वीर मराठ्यांची ‘पावन’गाथा
हिजाब वादाचे पडसाद महाराष्ट्रात तीव्र दिसत आहेत. या निमित्ताने नाशिकच्या मालेगाव शहरात ११ फेब्रुवारीला हिजाब दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या दिवशी सर्व महिला बुरखा घालतील. दरम्यान, राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.