राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा मुंडे यांना अटक करण्यात आली आहे.
बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याच्या आरोपावरून करूणा यांना पोलिसांनी अटक केली आहे. परळी येथे करुणा यांच्यावर ही कारवाई झाली. पण गाडीत कोणीतरी हे पिस्तुल ठेवून त्यांना गोवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करूणा यांनी केला आहे. तर या संबंधीचा एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर फिरताना दिसत आहे.
रविवार, ५ सप्टेंबर रोजी करुणा धनंजय मुंडे या परळी येथे दाखल झाल्या. करुणा परळी येथे येणार हे कळताच पोलिसांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून बंदोबस्त वाढवला. तणावाची परिस्थिती निर्माण होणार याचा अंदाज पोलिसांना आला होता. त्या परळीमध्ये दाखल होताच एकच गोंधळ पाहायला मिळाला. परळीतील प्रसिद्ध वैजनाथ मंदिराच्या इथे करूणा दर्शनासाठी येताच त्यांची गाडी अडवण्यात आली. करूणा वैजनाथ मंदिराच्या आवारात पोचताच धनंजय मुंडे समर्थकांनी आणि राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी करुणा यांना जाब विचारायला सुरुवात केली. तर त्यावेळी धक्काबुक्कीचाही प्रकार घडला. खबरदारीची उपाययोजना म्हणून स्थानिक पोलिसांनी करूणा यांना पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्या गाडीची झडती घेण्यात आली यावेळी त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आले. या पिस्तूलाचा कोणताही परवाना त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली.
हे ही वाचा:
पंतप्रधानांनी फोन करणे हे सुवर्ण पदकापेक्षाही मोठे
सुनील यादव यांच्या रूपातील अजातशत्रू जननेता गमावला
‘बाजारवाली मच्छी के साथ बदबू फ्री’ जाहिरातीवरून संताप
‘लाटा असे पापड’ ते ‘कासा ला बाहेर पडता!’ काय आहे हे वाचा…
मंदिराच्या आवारात गोंधळ सुरू असताना कोणीतरी करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तूल ठेवल्याचे करूणा यांच्याकडून सांगितले जात आहे. तसे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. करुणा सुरुवातीपासूनच हा त्यांना अडकवण्याचा कट असल्याचा आरोप करत होत्या. धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि दबाव टाकून माझ्या गाडीत रिव्हॉल्वर टाकली असा आरोप करूणा मुंडे यांनी केला आहे. तर माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. मुंडेनी बळाचा वापर केला आहे असा आरोपही करूणा यांनी केला आहे.