राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी जगमित्र साखर कारखाना लुटला असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे बोलताना सोमय्या यांनी धनंजय मुंडेंवर हल्ला चढवला आहे. या संबंधात आपण सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडे तक्रार केली असून धनंजय मुंडे यांनी मृत माणसांच्या नावावर पैसे लुटल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या हे सध्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आणि ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या मागे हात धुवून लागले आहेत. सरकारमधील विविध घोटाळ्यांच्या आणि भ्रष्टाचाराच्या आरोप करणाऱ्या सोमय्या यांच्या रडारवर सध्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे आले आहेत.
हे ही वाचा:
अनिल परबांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे अर्धशतक!
बांगलादेश मुक्तीचा सुवर्ण महोत्सव
UNESCO च्या संस्कृतिक वारसा यादीत दुर्गा पूजेचा समावेश
धनंजय मुंडे यांनी जगमित्र साखर कारखाना लुटल्याचा आरोप करताना मृत शेतकऱ्यांच्या नावावर मुंडे यांनी तब्बल ८० कोटी रुपये लाटल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. तर आर्थर रोड जेल मधील अनिल देशमुख यांच्या शेजारीच आणखीन एक खोली बुक केल्याचा टोला सोमय्यांनी लगावला आहे. मुंडे यांच्या या घोटाळ्यासंदर्भात आपण ईडीकडे तक्रार केल्याचेही सोमय्या यांनी सांगितले आहे.
किरीट सोमय्या हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांना धनंजय मुंडेंचे गुंड धमकावत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर सोमय्या यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांना नोटीस बजावल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावर या नोटिशीचा फोटो टाकत सरकारवर निशाणा साधला आहे. पोलिसांच्या नोटिशीत सोमय्या यांच्याकडून किंवा त्यांच्या समर्थकांकडून कोणत्याही प्रकारचे प्रक्षोभक वक्तव्य किंवा कृती घडू नये असे त्यांना सांगण्यात आले आहे.