महाराष्ट्र दिनानिमित्त आज, १ मे रोजी भाजपाच्या नेत्यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारक चौकात जाऊन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्र दिनाच्या जगभरातील तमाम मराठी बांधवांना आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेला, भारताच्या सर्व जनतेला खूप शुभेच्छा,” असं ते म्हणाले. “आमचा महाराष्ट्र हा प्रगतीच्या पथावर अग्रेसर राहो आणि हा महाराष्ट्र तयार करण्यासाठी ज्यांनी हौतात्म्य दिलं. अशा सगळ्यांना अभिवादन करत असताना, महाराष्ट्रातील शेवटचा व्यक्ती, दीन, दलित, गोर-गरीब, आदिवासी, शेतमजूर, शेतकरी, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक अशा सगळ्यांना या महाराष्ट्र दिनाच्या निमित्त खऱ्या अर्थाने या राज्याने न्याय द्यावा आणि त्यांच्या जीवनात प्रगती यावी, अशा शुभेच्छा आजच्या या महाराष्ट्र दिनी मी देतो,” असेही ते म्हणाले.
हे ही वाचा:
चेन्नईच्या संघाची धुरा पुन्हा धोनीकडे
अभिनेत्री प्रेमा किरण काळाच्या पडद्याआड
यावेळी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र कलादालनाबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की, “आज महाराष्ट्र दिवस आहे, काही लोक या ठिकाणी येऊन, राजकीय विधानं करतात. हुतात्मा स्मारक हे राजकीय विधानं करण्यासाठी नाही. ते हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आहे आणि महाराष्ट्र दिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळेजण येत असतो, त्यामुळे कुठल्याही राजकीय प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. मात्र महाराष्ट्र दिनाच्या निमित्त अशाप्रकारे तयार झालेलं कलादालन हे दुर्लक्षित असेल, तर त्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.