भाजपाच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांचे नाव विधीमंडळ गटनेता म्हणून निश्चित झालं. त्यामुळे गुरुवारी राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील हे चित्र स्पष्ट झाले. यानंतर राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार या महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांनी बुधवारी राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. महायुतीला निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालेलं असल्याने राज्यपालांनी या नेत्यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केलं असून गुरुवारी नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे.
सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावं, अशी विनंती त्यांना केली आहे. या विनंतीवर ते सकारात्मक विचार करतील अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “किती लोकांचा शपथविधी होणार, याची माहिती सर्वांना सायंकाळपर्यंत दिली जाईल. मुख्यमंत्रिपद किंवा उपमुख्यमंत्रिपद ही आमच्यासाठी तांत्रिक बाब आहे. महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतले आणि यापुढेही तसेच निर्णय घेऊ.”
हे ही वाचा..
महायुतीच्या नेत्यांकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा!
दोघा हिंदू भावांची मुस्लीम कुटुंबाकडून हत्या
सर्व आघाड्यांवर महाराष्ट्राला पुढे नेणार!
हैद्राबादहून मुंबईत अमलीपदार्थाची तस्करी करणाऱ्या चार जणांच्या आवळल्या मुसक्या
“भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य पक्ष, युवा स्वाभिमान, रासप आणि अपक्ष या महायुतीच्या वतीने आज आम्ही सह्यांचं पत्र देऊन राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे. हा दावा स्वीकारून राज्यपालांनी उद्या ५.३० वाजताची वेळ शपथविधीसाठी दिली आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या वतीने समर्थनार्थ पत्र दिल्याबद्दल विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानले. तसेच राष्ट्रवादीच्या वतीने अजित पवार यांनीही समर्थनाचं पत्र दिल्यामुळे त्यांनी त्यांचेही आभार मानले.