जनसेवेचा ध्यास, पुरग्रस्तांसोबत चार घास

जनसेवेचा ध्यास, पुरग्रस्तांसोबत चार घास

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बुधवारी पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा तडाखा बसलेल्या भागाची पाहणी केली. पण या पाहणी दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या माणुसकीचे दर्शन पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राला झाले. कारण या दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुराचा फटका बसलेल्या नागरिकांसोबत एकत्र जेवण केले. यावेळी त्यांनी नागरिकांसोबत मोकळेपणे संवाद साधत त्यांच्या व्यथा समजून घेतल्या.

गेल्या आठवड्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. या पावसात अनेकांचे संसार देशोधडीला लागले. ह्याचा सर्वाधिक फटका कोकणाला बसला असला तरी सातारा, सांगली, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बुधवार, २८ जुलै रोजी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला.

यावेळी सातारा जिल्ह्यातील मोरगिरी आंबेघर या भागात उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवासी शिबिराला त्यांनी भेट दिली. पाऊस आणि पूर त्यामुळे संसार उघड्यावर पडलेल्या नागरिकांची सोय या शिबिरांमध्ये करण्यात आली आहे. या निवासी शिबिरातील नागरिकांची जेवणाची व्यवस्था मोरगिरी येथील मोरणा विद्यालयात करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर या नागरिकांची भेट घेण्यासाठी गेले असता त्यांनी पूरग्रस्तांसोबत भोजनही केले.

हे ही वाचा:

नारायण राणे महाराष्ट्राबद्दल ‘हे’ म्हणाले

छगन हरण बघ

का दुःखी आहेत एसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी?

भाजपा आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री निधीला

यावेळी फडणवीस आणि दरेकर यांच्या वागणुकीत किंवा देहबोलीत कुठल्याही पाद्धतीचा बढेजाव नव्हता किंवा नागरिकांच्या वर्तनातही अवघडलेपण दिसले नाही. त्या शिबिरातील पुरग्रस्त नागरिकांच्या समवेत फडणवीस आणि दरेकर यांनी जमिनीवर बसून त्या नागरिकांसाठी बनवलेला डाळभात खाल्ला. यावेळी इतरही नागरिक त्यांच्या सोबत जेवताना दिसले. तर एकीकडे नागरिक आपले प्रश्न, अडचणी या नेत्यांना सांगत होते.

या प्रसंगातून देवेंद्र फडणवीस आणि दरेकर यांची जमिनीशी जोडलेली नाळ अजूनही तुटलेली नाही हे पुन्हा एकदा दिसून आले. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यादरम्यान सत्ताधारी पक्षाचे आमदार नागरिकांवर आरेरावी करताना, हात उचलताना दिसले. तर विरोधी पक्षाचे नेते मात्र नागरिकांच्या व्यथा समजून घेत त्यांच्यासोबत आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे नाते निर्माण करताना दिसत आहेत

Exit mobile version