राज्यात शिंदे गटाची सत्ता आल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाळ चिन्हावर दावा केला आहे. सध्या तरी धनुष्यबाण सर्वोच्च न्यायालयाच्या ताब्यात आहे. या धनुष्यबाणाची कमान शिवसेना की शिंदे गटाकडे याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय ८ ऑगस्टला देणार आहे. या दाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात सध्या जोरदार संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत असतानाच उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्यामध्ये बोलताना आता धनुष्यबाण कुणाचा हे निवडणूक आयोग ठरवेल. आमचं समर्थन एकनाथ शिंदेंसह धनुष्यबाणाला आहे. त्यांच्याकडे असलेल्या संख्याबळ बघता हा धनुष्यबाण त्यांच्या बाजूने जाईल, तेव्हा हा धनुष्यबाण मी त्यांना देईन असे विधान केले आहे.
शनिवारी धुळ्यामध्ये जयकुमार रावल यांच्या मतदार संघातील विविध विकास कामाचं उदघाटन आणि लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. या निमित्ताने कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांना चांदीची गदा भेट देण्यात आली. विरोधकांना गाडण्यासाठी भेट दिल्याचा उल्लेख या भेटीतून करण्यात आला. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी आणलेला चांदीचा धनुष्यबाण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आला. शिवसेनेचे चिन्ह असलेला धनुष्यबाणही एकनाथ शिंदे यांच्याचकडे येणार असे यातून सूचित करण्यात आले होते.
दौडाईचा येथे झालेल्या सभेत या भेटवस्तूवरूनच सूचक विधान करताना फडणवीस म्हणाले की, आमचं समर्थन धनुष्यबाणासोबत एकनाथ शिंदे साहेबांना आहे. सर्वाधिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे तुम्ही दिलेला धनुष्यबाण मी त्यांच्या हातात देणार आहे. तसंच सर्व सुनावणी झाल्यानंतर निवडणूक आयोगाचा निकाल येईल. मला पूर्ण अपेक्षा आहे की, निवडणूक आयोगाच्या वतीने धनुष्यबाण त्यांच्याच हातात येईल”, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा:
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून सत्तेची मलई ओरपलीत तेव्हा कुठे होता मराठी बाणा?
राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही
संजय राऊतांची शिवीगाळ करत असतानाची ऑडियो क्लिप व्हायरल
धनुष्यातील ‘बाणा’सोबत ‘अर्जुन’ही शिंदेंसोबत
अगोदरच गदा चालवली म्हणून परिवर्तन
मुख्यमंत्री शिंदे इथं येणार होते मात्र आम्ही निर्णय घेतला. एक कार्यक्रम त्यांनी करावा एक मी करेन आणि म्हणून मी इकडे आलो, ते तिकडे गेले. गदा आपण आगोदरच चालवली आहे म्हणून परिवर्तन झालं आहे. कारण आता हनुमान चालीसा म्हणायला बंधन नाही. आम्ही गदाधारी ते गधाधारी आहेत, असा टोला फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.