मविआ सरकारचे धोरण म्हणजे, ‘दुसऱ्याला लेकरं झाली तर प्रोत्साहन आम्हीच दिलं’

मविआ सरकारचे धोरण म्हणजे, ‘दुसऱ्याला लेकरं झाली तर प्रोत्साहन आम्हीच दिलं’

महाविकास आघडी सरकारचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ठाकरे सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्प बाबत बोलताना फडणवीसांनी सरकारचे वाभाडे काढले आहेत. आपल्या या भाषणात फडणवीसांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील अनेक त्रुटी दाखवून दिल्या आहेत.

ठाकरे सरकारचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. त्यावेळी देखील फडणवीसांनी या अर्थसंकल्पावर टीकास्त्र डागले होते. हा कळसूत्री सरकारचा पंचसूत्री अर्थसंकल्प असल्याचे फडणवीस म्हणाले होते. त्यांनतर त्यांनी आज विधिमंडळात बोलताना या अर्थसंकल्पाची मुद्देसूद चिरफाड केली आहे.

४ वर्षांपूर्वी मी जेव्हा म्हणालो होतो की राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन वर जाईल असे म्हटले होते तेव्हा महाविकास आघाडी सरकारने त्याची खिल्ली उडवली होती. पण आता सरकार तेच मांडत आहे. मी मांडलेल्या गोष्टी या सरकारने स्वीकारल्या आहेत. सरकारने मांडलेला अर्थसंकल्प आणि प्रत्यक्ष अर्थसंकल्प यात फरक असल्याचे फडणवीसांनी सांगितले. तर प्रत्यक्ष खर्च आणि दाखवलेला खर्च यातही तफावत असल्याचे म्हटले आहे.

या अर्थसंकल्पात पंचसूत्री ही नवी थीम मांडण्यात आली. पण त्यात नवे काहीच नाही. जुन्या दारूच्या बाटलीला नवे लेबल लावून विकणे सुरु आहे असे फडणवीस म्हणाले. जुन्या योजनांना नव्याने लेबलिंग करून सरकार पुढे आणत आहे. यात नवीन काहीच नाही. आधीच्या योजना आणि निधी वाटपाचेही श्रेय घेण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. दुसऱ्याला लेकरं झाली तर प्रोत्साहन आम्हीच दिलं असे मविआ सरकारचे धोरण आहे.

हे ही वाचा:

बारावीचा गणिताचा पेपर फुटला

फडणवीस यांना पाठवण्यात आलेली नोटीस ही आरोपी म्हणून नाही

 

दहशतवादाशी संबंधित ८१ जणांना सौदी अरेबियात फाशी

कॅनडामध्ये अपघातात पाच विद्यार्थ्यांना मृत्यू  

सरकारने जीडीपी वाढलेला दाखवला पण उत्पन्नात वाढ नाही. उलट राज्यातील वित्तीय तूट वाढली आहे. राज्याचे यश दाखवण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांचा आधार घेतला आहे. पण पंचसूत्री कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा साधा उल्लेखसुद्धा नाही. शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळत नाही. त्यामुळे सावकारी कर्जांमध्ये वाढ झाली आहे. सावकारी कर्ज २६ टक्क्यांनी वाढले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी न मिळाल्याने कर्जात वाढ झाली आहे. सरकारने याकडे लक्ष्य देण्याची गरज असल्याचे फडणवीसांनी बोलून दाखवले. तर राज्याचा कर्जाचा बोजाही वाढला आहे. राज्याचे कर्ज २ लाख कोटींनी वाढले आहे.

दरम्यान फडणवीसांनी निधी वाटपाच्या मुद्द्यावरूनही अर्थमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे. निधी वाटपात राष्ट्रवादी एके राष्ट्रवादी हे डंके की चोट पे सुरु आहे. निधी वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असलेल्या खात्यांना ५७ टक्के निधी देण्यात आला. तर शिवसेनेकडे असलेल्या खात्यांना केवळ १६ टक्के निधी देण्यात आला आहे.

या सरकारने अर्थसंकल्पात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी तरतूद केली आहे. या गोष्टीचे स्वागतच आहे. पण मग औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर का होत नाही? असा सवाल फडणवीसांनी केला आहे. तर इतरवेळी त्यासाठी आग्रही असलेले आता का शांत बसल्येत असा चिमटा शिवसेनेला काढला आहे.

तर फडणवीसांनी यावेळी शेतकऱ्यांच्या वीजतोडणीवरूनही सरकारवर हल्ला चढवला आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरीही वीजतोडणी थांबलेली नाही असा घणाघात फडणवीसांनी केला. ऊर्जा मंत्री पैसे नसल्याचे कारण पुढे करतात. आपल्या सरकारकडे विविध संरकांसाठी पैसे आहे. ती महत्वाची आहेत, गरजेची आहेत हे नाकारत नाही. पण शेतकऱ्यांना द्यायला पैसे का नाही? असा सवाल फडणवीसांनी केला आहे.

Exit mobile version