‘राष्ट्रवादीचा पोपट रोजच बोलतो’ असा टोला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री नवाब मलिक यांना उद्देशून फडणवीसांनी ही चपराक लगावली आहे. आर्यन ड्रग्स प्रकरणातील कारवाईनंतर नवाब मलिक हे आल्या दिवशी पत्रकार परिषद घेत आरोप करत असतात त्यावरूनच फडणवीसांनी निशाणा साधला आहे.
आर्यन खान ड्रग्स प्रकरणात कारवाई करणारे एनसिबीचे धडाकेबाज अधिकारी समीर वानखेडे हे नवाब मलिक यांच्या निशाण्यावर आले. वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या जावयाला देखील ड्रग्स प्रकरणी अटक केली होती. जो सध्या जामिनावर बाहेर आहे. तर आर्यन खान प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या विरोधात मोर्चा उघडून आरोपांच्या फैरी झाडण्याचा नित्यक्रम चालवला आहे. यामध्ये वानखेडे यांच्या सोबतच त्यांच्या कुटुंबीयांबाबतही विविध प्रकारचे आरोप केले जात आहेत. वानखेडे यांचे वडील, बहीण, पत्नी या सर्वांवरच मलिकांनी आरोप केले. यावेळी समीर वानखेडे हे भाजपाचे पोपट आहेत असा आरोप मलिकांनी केला आहे.
हे ही वाचा:
एसटीला गळफास घेऊन आणखी एका चालकाने गमावले प्राण
रिझर्व्ह बँकेला तीन वर्षासाठी नवी ‘शक्ती’
पंतप्रधान मोदी जाणार देवभूमीत! बाबा केदारनाथचे घेणार आशीर्वाद
‘थलैवा’ रजनीकांत हॉस्पिटलमध्ये
या संदर्भातच आज नागपूर येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली. यावर फडणवीस यांनी नवाब मलिकांना जोरदार टोला लगावला आहे. ‘राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतो’ त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची? तुम्हाला त्याचे महत्व वाटत असेल. आम्हाला वाटत नाही असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिक हे दखलपात्र नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले.