ठाकरे सरकारच्या कार्यकाळात लोकशाही कुलूपबंद झाली असून ‘रोख’शाही सुरु आहे असा घणाघात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. विधिमंडळाच्या होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी फडणवीसांनी ठाकरे सरकारच्या कारभाराची लख्तरे टांगली आहेत. ठाकरे सरकारला लोकशाही मान्य नाही आणि सरकारची अधिवेशन घ्यायची मानसिकता नाही असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
बुधवार, २२ डिसेंबर पासून महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळ अधिवेशन सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रथेप्रमाणे मंगळवार, २१ डिसेंबर रोजी सरकारमार्फत चहापानाचा कार्यलक्रम आयोजित करण्यात आला आहे. पण अपेक्षेप्रमाणे विरोधी पक्षाने या चहापानावर बहिष्कार घालत सरकारचा निषेध केला आहे. फडणवीस यांनी जाहीर केले आहे. ज्या सरकारला लोकशाही मान्य नाही त्या सरकार कडून काय अपेक्षा करणार असे म्हणत विरोधी पक्षाने एकमताने चहापानावर बहिष्कार घालण्याचे या संदर्भात विरोधी पक्षाचे नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीसांनी सरकारवर तोफ डागली आहे.
महाराष्ट्र सरकार स्थिर असल्याचा दावा फोल असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. सत्ताधारी पक्षाला आपल्याच आमदारांवर विश्वास नाही. म्हणून विरोधी पक्षातले १२ आमदार निलंबित करून अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा घाट सरकारने घातला आहे. आजवर अध्यक्ष पदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होत असल्याचा पायंडा आहे. तरी देखिल सरकारने नियम बदलून आवाजी मतदानाचा पर्याय आणला आहे.
हे ही वाचा:
बड्या धेंडांकडून १३ लाख कोटी वसूल
ती म्हणते लाल किल्ला माझा, मला द्या!
एअर ऍम्ब्युलन्समध्ये ओदिशाचा पहिला नंबर
परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपे निलंबित
तर ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात हे सरकार उघडे पडले आहे असे फडणवीस यांनी म्हटले आहे. दोन वर्ष आम्ही सांगत होतो तारेच्याही सरकारने इम्पिरिकल डेटा गोळा केला नाही आणि आता सरकारी वकील कोर्टात सांगतात की आम्हाला मुदत द्या, आम्ही इम्पिरिकल डेटा गोळा करू. मग दोन वर्ष हे सरकार का झोपा काढत होते? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.
यावेळी फडणवीसांनी परीक्षा घोटाळ्याच्या मुद्द्यावरूनही सरकारला धारेवर धरले आहे. राज्य सरकारच्या काळात एका विभागात नाही तर तीन विभागातले परीक्षांचे गोंधळ समोर आले आहेत. विद्यार्थ्यांचा या व्यवस्थेवरचा विश्वास उडत चालला आहे. या सगळ्यांचे धागे मंत्रालयात जात आहेत. अशावेळी पोलिसांवर दबाव असून पोलीस कारवाई करू शकत नाहीत तेव्हा या परीक्षा घोटाळ्यांची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
ठाकरे सरकारच्या काळात सस्ती दारू, मेहेंगा तेल अशी परिस्थिती असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवरील कर कमी करून देखील राज्य सरकारने आपले कर कमी केलेले नाहीत. उलट सरकारने दारू वरील कर कमी करायचे काम केले आहे असा फटकारा फडणवीसांनी लागलेला आहे.
तर विद्यापीठ कायद्यात बदल करण्याच्या प्रस्तावालाही विरोधी पक्षाने विरोध दर्शवला आहे. सरकार घेऊन येत असलेल्या या कायद्याला विद्यापीठांच्या सर्व माजी कुलगुरूंनी विरोध दर्शवला आहे. या कायद्यात बदल करून सरकारला विद्यापीठावर अधिपत्य हवे आहे. त्यासाठीच या कायद्यात बदल केला जात आहे. या कायद्यालाही भाजपा अधिवेशनात विरोध करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.