भारतीय जनता पार्टीच्या जन आशीर्वाद यात्रेवरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात भाष्य करताना हे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारे ठरणार की काय असे म्हणत भाजपावर निशाणा साधला तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर चांगलाच पलटवार केला आहे.
मुख्यमंत्र्यांची चिंता रास्तच आहे पण हेच त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेलाही सांगावे असे म्हणत फडणवीसांनी सरकारवर हल्ला चढवला आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ब्रह्मज्ञान देताना बाकीच्यांना कोरडे पाषाण ठेवू नये असे म्हणत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यामुळे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच शाब्दिक कलगीतुरा रंगलेला दिसला.
हे ही वाचा:
तालिबानपासून मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी काय करत आहेत महिला?
पुणे पोलिस आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
अफगाणिस्तानमध्ये लोकशाही नाही तर, केवळ शरिया
पुढे जाऊन फडणवीसांनी विरोधकांवर चांगलीच फटकेबाजी केली आहे. भाजपाला मिळणारे जन समर्थन आणि पाठिंबा बघता हे विरोधकांना धडकी भरवणारे नक्कीच आहे असे मत फडणवीस यांनी मांडले आहे. तर जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मिळणाऱ्या पोलिसांच्या नोटीस आणि कार्यकर्त्यांवर दाखल होणारे गुन्हे याबद्दल प्रतिक्रिया देताना ‘आमचा डीएनए हा विरोधी पक्षाचा आहे. त्यामुळे अशा नोटिसा आणि गुन्ह्यांची भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सवय आहे. त्यामुळे पोलिसांच्या बळाचा वापर करून भाजपाला थांबवणे शक्य नाही. आम्ही त्याला घाबरत नाही. आमचा पिंड हा संघर्षाचा आहे असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घ्यायला विरोध करणे ही संकुचित वृत्ती आहे आणि अशा संकुचित वृत्तीला महाराष्ट्राच्या संस्कृतीत थारा नाही अशी स्पष्टोक्ती फडणवीसांनी केली आहे. तर स्वतः हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील अशाप्रकारे वागणाऱ्यांना माफ केले नसते असे फडणवीस म्हणाले.