महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालीसा म्हणण्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. अशातच आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत असताना अस्खलितपणे हनुमान चालीसा म्हणून दाखवली. हनुमान चालीसा म्हणण्याच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला धारेवर धरताना फडणवीसांनी हनुमान चालीसा पठण केले. सध्या राज्यभर याची चांगलीच चर्चा असून समाज माध्यमांवरही फडणवीस यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
नरिमन पॉईंट येथील भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यालय येथे सोमवार, २५ एप्रिल रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचा निर्धार करणाऱ्या राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याबद्दल त्यांनी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले.
हे ही वाचा:
सोमय्याप्रकरणी महाडेश्वरांना अटक व जामीन
फ्रान्सची सूत्रे पुन्हा मॅक्रोनच्याच हाती
जातीवरून हिणवत छळ केल्याचा नवनीत राणांचा आरोप
कोल्हापूर न्यायालयात सदावर्तेंचा जामीन मंजूर
भारतात हनुमान चालीसा म्हणायचे नाही, तर पाकिस्तानात म्हणायची का? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला. जर महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हटले म्हणून राजद्रोहाचा गुन्हा दाखल होत असेल तर आम्ही रोज हनुमान चालीसा म्हणू असा निर्धार फडणवीस यांनी बोलून दाखवला. याच वेळी त्यांनी पत्रकार परिषदेत अस्खलितपणे हनुमान चालीसा म्हटली.
एकीकडे संजय राऊत आणि इत्तर शिवसेना नेत्यांची हनुमान चालीसा म्हणताना दमछाक होत असतानाच फडणवीसांनी कुठेही न अडखळता म्हटलेल्या या हनुमान चालीसाची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.