महाराष्ट्रात पडलेला मुसळधार पाऊस, दरडींखाली चिरडून झालेले मृत्यू, अनेक जिल्ह्यात आलेला महापूर या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात पवारांनी केलेल्या वक्तव्यांवर विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली.
“पवार साहेबांनी जे काही आवाहन केलं आहे त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की, दौरे करताना दौरे करणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या दौऱ्याचा ताण हा शासकीय यंत्रणेवर येऊ नये.” असं प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यांना दिलं आहे.
“मी तर विरोधी पक्षनेता आहे. आम्ही जातो तेव्हा शासकीय यंत्रणा फारशी तिथे नसतेच. कारण सरकारनं तसा जीआरच काढलेला आहे. पण आमचे दौरे यासाठी गरजेचे आहेत की, आम्ही गेलो तर शासकीय यंत्रणा जागी होते. आम्ही गेल्यामुळे कुठेतरी शासकीय यंत्रणा कामाला लागते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांचा जो आक्रोश आहे तो आम्हाला समजून घेता येतो आणि तो सरकारपुढे मांडता येतो. त्यामुळे पवार साहेबांच्या आवाहनाचा एवढाच अर्थ घेतला पाहिजे की, रेस्क्यू ऑपरेशन किंवा मदतकार्य आपल्यामुळे थांबता कामा नये. त्यामुळे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण विरोधी पक्षनेता म्हणून जो काही दौरा आहे तो मी येत्या ३ दिवसांत करणारचं आहे.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्यात जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा मदतकार्य होणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोणत्याही नेत्यानं प्रसंगावधान राखलं पाहिजे. अशा प्रकारचे दौरे केल्याने यंत्रणा त्यांच्यासाठी फिरवावी लागते. ते योग्य नाही. त्यामुळे ज्यांचा या भागाशी दैनंदिन संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळावा, असं आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.
हे ही वाचा:
एवढा ‘ज्यू द्वेष’ की ऑलिम्पिकचंही महत्व नाही
रिलायन्सच्या नावाने ‘हा’ नवा विक्रम
राज्यपाल कोश्यारी आज पूरग्रस्तांना भेटणार
लोकहित जोपासण्याचा शिवसेनेशी कोणताही संबंध राहिलेला नाही
दरम्यान, आज मुंबई भाजप आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं कोकणात ९ ट्रक माल पाठवण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली. त्यात प्लास्टिकच्या चटच्या, घरगुती वापराच्या वस्तू, सॅनीटरी पॅडपासून सगळं असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही रोज काहीना काही पाठवण्याचा प्रयत्न करु. आम्ही जेव्हा कोकणाचा दौरा केला तेव्हा हे लक्षात आलं की तिथे घरात किंवा दुकानात काहीच उरलेलं नाही अशी स्थिती आहे. तिथली गरज ओळखून आवश्यक असणारी सामग्री आम्ही पाठवत आहोत, असं फडणवीस म्हणाले.