विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून या पत्रामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना विशेष पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. गोपीचंद पडळकर हे सध्या मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सांगली आणि सोलापूरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी केल्याचे वृत्त ‘टीव्ही ९’ने दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करणारे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पाठवले आहे. ‘गोपीचंद पडळकर यांच्या जिवाला धोका आहे. त्यांना तातडीने सुरक्षा द्यावी,’ अशी मागणी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘पडळकर हे सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करत असतात. बहुजनांच्या हक्काचे लढे लढत असतात. त्यामुळे दुखावलेले लोक त्यांच्यावर सातत्याने हल्ले करताना दिसून येत आहेत. यात सत्ताधारी पक्षाच्या लोकांचाही सहभाग आहे,’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला लगावला आहे.
हे ही वाचा:
पवई येथील ह्युन्डाई कार सर्व्हिस सेंटर आगीच्या तडाख्यात
‘बोगस शेतकऱ्यांना मिठ्या मारणारे एसटी कर्मचाऱ्यांना दम भरतायत’
तळपत्या ‘सूर्या’ च्या किवींना झळा
‘लोकशाहीमध्ये विरोधकांचा आवाज हिंसेने दाबणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि लोकशाहीला ते अभिप्रेतही नाही. त्यामुळे स्वपक्षीय असो किंवा विरोधक पण त्याच्या जिवास धोका असेल तर त्याला सुरक्षा पुरवणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. गोपीचंद पडळकर यांच्याही जिवाला धोका निर्माण झाला असून त्यांना सुरक्षेची गरज आहे. राज्य सरकारने त्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा, पडळकरांच्या जीविताचे काही बरेवाईट झाल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी सरकारची असेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रातून स्पष्ट केले आहे.
गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सांगली आणि सोलापूरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी केली आहे.