महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून फडणवीस यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत महत्वाचा इशारा ठाकरे सरकारला दिला आहे. राज्यातील एकूण परिस्थिती सोबतच राजधानी मुंबईच्या परिस्थितीवर फडणवीसांनी विशेष भाष्य केले आहे.
देशभरासह महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. सध्या मुंबईत रुग्णांची संख्या कमी येत असल्याचे चित्र निर्माण झाले असले तरी राज्याची परिस्थिती अजूनही नियंत्रणात नाही. याच सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र लिहिले आहे. या पात्राद्वारे मुख्यमंत्र्यांचे लक्ष्य कोरोना संबंधित अनेक महत्वाच्या विषयांकडे वेधण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला आहे.
हे ही वाचा:
कमिन्सच्या दातृत्वाने मोदी विरोधकांना पोटशूळ
सौदी अरेबियातील विद्यार्थी गिरवतायंत रामायण, महाभारताचे धडे
देवेंद्र फडणवीसांचे ज्युलिओ रिबेरोंना खुले पत्र
पप्पूगिरीचे सर्व हक्क काँग्रेसकडे राखीव
फडणवीसांनी पत्रात काय लिहिले आहे?
मुंबईत सातत्याने चाचण्या कमी होत आहेत आणि त्यातही आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या कमी झाली आहे. असे म्हणताना फडणवीस यांनी गेल्या आठ दिवस झालेल्या मुंबईतील चाचण्यांची आकडेवारी आपल्या पत्रात दिली आहे. या आकडेवारीत मुंबईचे टेस्टिंग दिवसेंदिवस कमी होत गेल्याचे दिसत आहे. आठ दिवसांची टेस्टिंगची सरासरी पाहिली तर दिवसाला ४०,७६० इतकी येते. ४० लाख लोकसंख्येच्या नागपूर जिल्ह्यात दिवसाला २६,७९२ टेस्टिंग होत आहेत. ६८ लाखांच्या पुण्यात सुद्धा सरासरी २२,००० टेस्ट होत आहेत. असे असताना या शहरांच्या तीन ते चार पट लोकसंख्या असणाऱ्या मुंबईत केवळ ४०,००० च्या आसपास टेस्टिंग होत आहे.
तसेच राज्यात होणाऱ्या ४०% टेस्ट या अँटीजेन टेस्ट आहेत. त्यामुळे हा आकडा गृहीत धरल्यावर मुंबईत अतिशय कमी प्रमाणात आरटीपीसीआर चाचण्या होत आहेत. त्यामुळे मुंबईचे नेमके चित्र समोर येऊच शकत नाही असे फडणवीसांनी म्हटले आहे. मुंबईचा संसर्ग दर हा सातत्याने १४ ते १८ टक्के असताना आणि राज्याचा दर हा सातत्याने २५ ते २७ टक्के राहत असताना कमी चाचण्या आणि कमी आरटीपीसीआर चाचण्या या परवडणाऱ्या नाहीत असा गंभीर इशारा फडणवीसांनी दिला आहे.
मुंबईतले संक्रमित लोक हे गावी जात आहेत. गेल्या लाटेत त्यांचे जसे ट्रॅकिंग आणि तेसिंग झाले होते तसे या लाटेत होताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोनाचे प्रमाण वाढत आहे असे फडणवीसांनी म्हटले आहे. तसेच मुंबईची मृत्युसंख्या दडवण्याचा सातत्याने प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. रिकन्सिलिएशनचे काम पूर्ण झालेले दिसत नाही. त्यामुळे जुनी मृत्यूसंख्या टप्प्याटप्प्याने अधिक करून नेमके चित्र उभे राहणार नाही असे मत फडणवीसांनी मांडले आहे. मुंबईच्या घाटांवर रोज अंत्यसंस्कार होणारे मृतदेह आणि जिल्ह्यातील रोजची मृतांची आकडेवारी यात तफावत असून त्यांचा कसलाही ताळमेळ नाही. राज्यातील एकूण मृत्युसंख्येपैकी २० टक्के रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्यातील कोणत्याच भागाकडे दुर्लक्ष परवडणारे नाही असे फडणवीसांनी पत्रात लिहिले आहे.
कोरोना कमी व्हावा अशी आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे. पण संसर्ग दर १५ टक्केंपेक्षा अधिक असताना कोरोना जातोय असे आभासी चित्र निर्माण करणे योग्य नाही. आकडेवारी शिखरावर असताना शिखरावरचा वेळ कमीत कमी कसा करता येईल आणि त्या दरम्यान आपत्ती कशी कमी करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे मत फडणवीसांनी मांडले आहे.
मुंबईसह राज्यात कमी होत असलेल्या चाचण्या, आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण कमी, संसर्ग वाढण्याचा धोका, राज्यातील एकूण मृत्यूंपैकी 20 टक्के मृत्यू मुंबईत होऊन सुद्धा जुन्या नोंदी अपडेट न होणे, त्यातून नेमकी माहिती कोरोना लढ्यासाठी उपलब्ध न होणे…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांना पत्र pic.twitter.com/ZfUTujaG6Y— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 27, 2021