ही हिंदु्त्वाची लढाई आहे, आम्हाला पदे नको होती!

ही हिंदु्त्वाची लढाई आहे, आम्हाला पदे नको होती!

देवेंद्र फडणवीस यांचे उद्गार

महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार बुधवार, २९ जून रोजी सरकार कोसळल्यानंतर नव्या सरकार स्थापनेसाठी हालचालींना वेग आला होता. त्यानंतर बंडखोर आमदार एकनाथ शिंदे हे आज मुंबईत दाखल झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.

२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा- शिवसेना अशी युती होती. निवडणुकीत भाजपाने १०५ जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेने ५६ जागा अशा १६१ जागा जिंकल्या होत्या. अपक्ष मिळून १७० आमदार होते. त्यानंतर भाजपा- शिवसेना सरकार येईल अशी अपेक्षा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केली होती की भाजपाचा मुख्यमंत्री बनेल. मात्र, उद्धव ठाकरेंनी त्यावेळी वेगळा निर्णय घेतला. बाळासाहेबांनी ज्यांचा विरोध केला अशा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत युती केली. हा जनतेचा अपमान होता. जनतेने शिवसेना आणि भाजपा युतीला मत दिलं होतं, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारच्या कारभारात भ्रष्टाचार झाला. दोन मंत्री तुरुंगात जाणं ही महाराष्ट्रासाठी खेदजनक बातमी आहे. इतकं असूनही बाळासाहेबांनी ज्या दाऊदचा विरोध केला त्याच्याशी संबंध असणाऱ्या मंत्र्यांना पदावरून काढलं नाही. शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीने औरंगाबादचं संभाजीनगर केलं. अजूनही काही नावे बदलली पण राज्यपालांचे पत्र आल्यावर. पण अशा वेळी नियमानुसार कॅबिनेट घेता येत नाही. त्यामुळे ते बदल अवैध असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एकनाथ शिंदे हे गटनेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये या आमदारांची कुचंबना झाली. त्यांच्या मनात असं होतं की, हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार आमचे विरोधक होते. पण सरकारमध्ये असल्यामुळे त्यांना निधी मिळतो. त्यानंतर बंड पुकारल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीला सोडा असं आमदारांनी म्हटलं होतं मात्र, दुर्दैवाने उद्धव ठाकरेंनी त्यांनाचं प्राधान्य दिलं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

हे ही वाचा:

कन्हैयालाल हत्या प्रकरणातील आरोपीचा पाकिस्तानशी संबंध

उदयपूर मधील कन्हैयालालसाठी २४ तासात जमले १ कोटी

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर

कुलगाममध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

अडीच वर्षे मी सांगत होतो असं सरकार चालत नाही. हे सरकार पडलं तर अल्टरनेट सरकार देऊ. जनतेला निवडणूकीचा भार नको. आता शिवसेना विधिमंडळ गट, भाजपा विधिमंडळ गट, १६ अपक्ष असे एकत्र आलेत आणि राज्यपालांना पत्र दिलंय. आम्हाला पद नको होती. ही हिंदुत्वाची लढाई आहे, वैचारिक लढाई आहे, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील असं जाहीर केलं. स्वतः मंत्रिमंडळाच्या बाहेर असतील असंही ते म्हणाले. एकनाथ शिंदे हे राज्यातील सर्व निलंबित प्रश्न सोडवतील असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज संध्याकाळी ७.३० वाजता त्यांचा एकट्याचा शपथविधी होणार आहे.

Exit mobile version