मुख्यमंत्र्यांनी केवळ गरळ ओकली

मुख्यमंत्र्यांनी केवळ गरळ ओकली

देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

‘एकेकाळी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विचारांचे सोने लुटले जायचे. पण काल या मेळाव्यात फक्त गरळ ओकली जात होती,’ असे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला आहे. काल, शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) मुंबईत येथे पार पडलेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लक्ष्य केले होते. तर त्यावरूनच आता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. नागपूर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

‘जनतेने भाजपला नाकारले नाही. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नाकारले आणि तुम्हाला वरपास केले आहे. भाजपने लढवलेल्या जागांपैकी ७० टक्के जागा भाजपने जिंकल्या होत्या आणि शिवसेनेने ४५ टक्के जागा जिंकल्या होत्या. मात्र, तुम्ही जनतेच्या मतांशी बेईमानी करून सत्तेवर आला आहात. त्यामुळे हे बेईमानीने तयार झालेले सरकार आहे. आता तरी उद्धवजींनी हे मान्य करायला हवे की, मुख्यमंत्री बनण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती आणि दिलेला शब्दच जर पूर्ण करायचा होता तर इतर कोणा शिवसैनिकाला मुख्यमंत्री पद देता आले असते. सुभाष देसाई, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे यांची नावे देखील होती,’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अंगात रक्ताचा एक थेंब आहे तोवर आम्ही महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही
दसरा मेळाव्याच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘बंगाल पॅटर्न’ विषयी भाष्य केले होते. त्यावरून देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्राचा बंगाल कारायचा आहे म्हणजे नक्की काय करायचे आहे? खंडणीबाजीमुळे बंगालमध्ये एकही उद्योग टिकला नाही. तुमच्या विरोधात जो बोलेल त्याचे हात पाय तोडून त्याला फासावर लटकवायचे असा महाराष्ट्र घडवायचा आहे का?’ असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे. तसेच आमच्या अंगात रक्ताचा एक थेंब आहे तोवर आम्ही महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. महाराष्ट्र हा महाराष्ट्रचं राहील, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

हे ही वाचा:

बालकल्याण मंत्री म्हणतात, महिलांनो झोपायच्या आधी थोडी दारू प्या!

‘उद्धवजींमध्ये राहुलजी स्पष्ट दिसतात’

राहुल द्रविडकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

धोनीच्या ३००व्या सामन्यात चेन्नई संघाने लुटले विजेतेपदाचे सोने

उद्धव ठाकरे यांनी संघराज्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ही व्यवस्था बदलली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलण्याचे मनसुबे त्यांनी काल बोलून दाखवले. मात्र, काहीही झाले तरी संविधान बदलले जाणार नाही आणि तसे होणारही नाही. त्यामुळे कम्युनिस्ट लोकांना आणि डाव्या विचारांच्या पक्षांना सोबत घेऊन हा जो मनसुबा रचला जात आहे तो आम्ही पूर्ण होऊ देणार नाही,’ असे फडणवीसांनी स्पष्ट केले.

या सरकारचा खंडणी हा एकच अजेंडा
‘सध्या सुरू असणारी छापेमारी तसेच ईडी, सीबीआय यांच्या सुरू असलेल्या कारवाई आम्ही आणलेल्या नाहीत; त्या उच्च न्यायालयाने आणल्या आहेत. त्याच कारण म्हणजे उद्धवजी तुम्ही ज्या सरकारचे नेतृत्व करत आहात ते महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. या सरकारचा एकच अजेंडा आहे आणि तो म्हणजे खंडणी. एजन्सीचा गैरवापर आमच्याकडून कधीच केला जाणार नाही. पण भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय शांत बसणार नाही,’ असे फडणवीसांनी म्हटले आहे.

‘सरकार पाडून दाखवा, पाडून दाखवा अशा घोषणा करण्यापेक्षा तुम्ही सरकार चालवून दाखवा, जनतेचे प्रश्न सोडवा, शेतकऱ्यांना मदत करा. आम्हाला सरकार पाडण्यात रस नाही; जनतेच्या समस्यांमध्ये रस आहे आणि सरकार जेव्हा पडेल तेव्हा तुम्हालाच कळणार नाही,’ असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.

Exit mobile version